महोदय,
माझ्या मुलाला एका नामांकित इन्स्टिट्यूट मधून माहिती मिळाली की पुणे येथील एका प्रसिद्ध कंपनी मार्फत मालदीव येथे थ्री स्टार किंवा फाईव्ह स्टार हॉटेल मधे चांगला जॉब मिळू शकतो. म्हणून माझ्या मुलाने त्याच्या मित्रांनी पुण्यातील संबंधित ऑफिस मध्ये चौकशी केली. तेव्हा त्यांना असे सांगण्यात आले की, मालदिव येथे थ्री स्टार किंवा फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये चांगला जॉब आहे. तिथे तुम्हाला ३०० ते ४०० डॉलर पगार मिळेल. तिथे तुमची राहण्याची आणि चहा, नाष्टा, जेवण ही सोय पण होईल. ती सर्व व्यवस्था आम्ही करू. त्यासाठी अडीच लाख रूपये लगेच भरा. म्हणजे मुले २/३ दिवसांत मालदीवला जातील. असे सांगून आमची खूप मोठी दिशाभूल केली. त्यास आम्ही फसलो.
लगेच म्हणजेच दि.९.९.२१.रोजी तिघांनी प्रत्येकी अडीच लाख रू भरले आणि १३.९.२१ ला मुले मालदीवला गेली. परंतु जाताना मुलांना ऑफिसने कोणतीही व्यवस्थित माहिती दिली नाही. त्यामुळे मुंबई एअरपोर्ट पासूनच मुलांची गैरसोय सुरू झाली. त्यांना मालदीव मध्ये थ्री स्टार किंवा फाईव्ह स्टार हॉटेल दाखवणारी व्यक्ती तर तिसऱ्या दिवशी भेटली. त्याने फाइव स्टार हॉटेलच्या ऐवजी फक्त एकच छोटे कॅफे हाऊस दाखवलं. बाकी काहीही दाखवले नाही.
मुलांना चहा, नाष्टा, जेवण हे तर एक दिवसही दिले नाही. त्यांनी एकाच खोलीत तीन मुलांना ठेवले. त्यांना पाच दिवस आंघोळीला पाणीही मिळाले नाही. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मालदीव मध्ये कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे तिकडं मुल आणि इकडे मी व माझे कुटुंब खूप घाबरून गेलो. गोंधळलो. आता काय करावे, ते आम्हाला काही सुचेना. अशा वेळेस ग्राहक पंचायत नक्की काहीतरी मार्ग काढेल या आशेने आम्ही ग्राहक पंचायतीचे श्री विलास लेले यांना भेटलो. त्यांना सर्व हकीगत सांगितली. नंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी मुलाकडून रोज मालदीव मधील माहिती मावूनन त्या नुसार पुण्यातील ऑफिस मध्ये सतत मुलांच्या अडचणी सांगू लागलो.
तेव्हा त्यांना कळले की, आम्ही ग्राहक पंचायतीकडे गेलो आहोत. तेव्हापासून ते आमच्याशी अतिशय गोड गोड बोलून आश्वासने देत आमची समजूत काढण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु आमचा भरवसा उडाल्यामुळे काही करून मुलांना पुण्यात परत आणावयाचे, असे आम्ही ठरवले. त्याप्रमाणे मी पुणे ऑफिसमधील लोकांशी बोललो तेव्हा ते म्हणाले की, मुलांना परत आणतो पण, आम्ही स्वखुशीने मुलांना परत आणतोय, असे लिहून द्या. मग मुले पुण्यात येतील. पण पैसे मात्र परत मिळणार नाहीत. अशी बोलाचाली सुरू असताना या कंपनीच्या मुंबई ऑफिस मधील एका अधिकाऱ्याने दि.१७.९.२१. रोजी माझ्याशी व श्री लेले यांच्याशी संपर्क करून बराच वेळ चर्चा केली. आम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा श्री लेले यांनी त्या अधिकाऱ्यांना बरेच काही सुनावले. सांगितले की, मुलांना ताबडतोब परत अणा आणि त्यांचे सर्व पैसे परत करा. ज्या क्षणी त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, त्याच क्षणी मुले तुम्हाला तुमच्या पत्रावर सही देतील.
दिनांक १८.९.२१. रोजी तिघांना विमानाची तिकिटे देऊन मुंबईत आणले. तेथून रात्री एक वाजता मुले घरी आली. २३.९.२१ रोजी कंपनीने फक्त विमान तिकीट व विसाचे पैसे कट करून श्री लेले यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मुलाचे दोन लाख वीस हजार रुपये त्यांच्या त्यांच्या खात्यात जमा केले. म्हणून मी अ. भा. ग्राहक पंचायत व पंचायतीचे कोषाध्यक्ष श्री विलास लेले यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत व श्री विलास लेले कोणाहीकडून कसलीही फी वगैरे काहीही घेत नाहीत हे विशेष वाटते. म्हणून परत एकदा आमच्या सर्वांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. आमच्या प्रमाणे इतरांची दिशाभूल व फसवणूक होऊ नये म्हणून हा पत्रप्रपंच.
श्री संदीप पतेने.
१३३, दांडेकर पूल, सानेगुरुजी शाळेजवळ पुणे-३०.
मो.नं.९८५०९४०१०९