नवी दिल्ली – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अखेर कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस दोन दिवसांपूर्वी घेतला. त्यामुळे ते गुरुवार आणि शुक्रवारी संसदेत आले नाहीत. लस घेण्यावरून भाजपकडून अनेकदा राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्यात आले आहेत. तसेच त्यांच्यावर टीकाही केलेली आहे. त्यांनी कोणती लस घेतली हे अद्याप समजू शकलेले नाही.
राहुल गांधी यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती २० एप्रिलला ट्विट करून दिली होती. कोरोनाबाधित झाल्यामुळे त्यांना लस घेण्यास उशीर झाल्याचे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोरोनाच्या लशीचे दोन्ही डोस घेतल्याचे एका नेत्याने सांगितले.
सोनिया यांच्यासह राहुल आणि प्रियंका गांधी यांनी लशीचा पहिला आणि दुसरा डोस कधी घेतला, हे जाणून घेण्याची इच्छा पूर्ण देशाला आहे, असे ट्विट करून भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रश्न विचारला होता.
भारतात सध्या लसीकरणासाठी कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुतनिक-व्ही लस उपलब्ध आहे. यापैकी कोणत्या लशीचा डोस राहुल गांधी यांनी घेतला याबाबत माहिती मिळालेली नाही. देशात आतापर्यंत कोविडविरोधी ४६ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.