नागपूर – रस्ते अपघातात होणारी मनुष्य हानी व वित्त हानी संबंधित कुटुंबावर दूरगामी परिणाम करणारी असते. त्यामुळे रस्ते वाहतूक विषय अतिशय संवेदनशीलतेने हाताळणे गरजेचे आहे. रस्त्यांवरील अपघात कमी कसे होतील, त्यामध्ये मनुष्यहानी होणार नाही, याकडे लक्ष वेधणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अभय मनोहर सप्रे यांनी आज येथे केले.
सर्वोच्च न्यायालयामार्फत गठीत करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा समितीची आढावा बैठक आज या समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश अभय मनोहर सप्रे यांनी हॉटेल प्राइड येथे घेतली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला महामार्ग व वाहतूक अप्पर पोलीस महासंचालक भूषण कुमार उपाध्याय, परिवहन आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी विमला आर, पोलीस आयुक्त श्रीमती अश्वती दोर्जे, वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी. व्ही. पातुरकर, नॅशनल हायवेचे महाव्यवस्थापक श्री. वडेट्टीवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी खंडेराव देशमुख, प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर ग्रामीण बजरंग खरमाटे, तसेच रस्ते व संबंधित यंत्रणाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती सप्रे यांनी अपघातावर नियंत्रण व अपघात कसे कमी होतील तसेच त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कशाप्रकारे कमी करता येईल, याबाबत लक्षवेधण्याचे निर्देश दिले. रस्त्यांच्या कामाची गुणवत्तापूर्वक परिपूर्ती आवश्यक आहे. ब्लॅक स्पॉटची कामे त्वरेने पूर्ण करणे गरजेचे आहे. काम पूर्ण केल्यानंतर अपघाताचे प्रमाण कमी झाले काय याबाबतची गुणवत्तापूर्ण तपासणी आवश्यक आहे. रस्त्यावरील वेगमर्यादेचे उल्लंघन हे अपघाताचे प्रमुख कारण असून त्यामुळे 69% अपघात होतात. त्यावर पोलिस व परिवहन विभागामार्फत नियमांची कडक अंमलबजावणी करून धाक निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच याबाबत सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचे आहे. या संदर्भातील जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात यावी. प्रत्येक यंत्रणेने आपसात समन्वय ठेवावा. अपघातामध्ये जखमी होणाऱ्या व्यक्तीला तातडीने उपचार मिळाले पाहिजे. तसेच अपघातासंदर्भातील अनुषंगिक कारवाई तातडीने पार पडायला पाहिजे. हे सर्व कार्य अतिशय संवेदनशीलतेने प्रत्येक यंत्रणेने केले पाहीजे. यासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा, असे निर्देशही सप्रे यांनी या बैठकीमध्ये दिले.
यावेळी त्यांनी शासन उत्तम रस्ते बनवेल. आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक, सूचनाफलक लावेल. मात्र सोबतच रस्त्यावर वाहन चालवणाऱ्यानी हेल्मेट घालणे, सिट बेल्ट लावणे, विरुद्ध दिशेने वाहन न चालवणे, नशेत वाहन न चालवणे, यासाठी स्वयंशिस्त पाळणे, आवश्यक आहे. हे सर्व नियम लाखमोलाचे जीव वाचविण्यासाठी तयार झाले आहेत. हे नागरिकांवर बिंबवण्यासाठी प्रसिद्धी अभियान राबवा. नागरिकांना वारंवार आवाहन करा, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.