विशेष प्रतिनिधी, नागपूर
भारतीय व्यंजनांमध्ये तुपाटे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेवणाच्या ताटातील अनेक पदार्थांचा स्वाद वाढविण्यास गावराणी तुपाची मदत होते. आयुर्वेदात तर तुप हे औषध असल्याचे म्हटले आहे. डॉक्टरसुद्धा प्रत्येक मोसमात तुप खाण्याचा सल्ला देतात. हेच तप रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. त्यामुळे सध्या कोरोनाच्या काळात तुप आवर्जून खायला हवे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
शुद्ध तुपात व्हिटामिन ए, के, इ, ओमेगा-३ आणि ओमेगा-९ फॅटी अॅसीड असतात. हे अनेक आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपयुक्त आहेत. विशेषतः बदलत्या वातावरणातील सर्दी–खोकला किंवा तापावर तुप हे रामबाण औषध आहे. सोबतच त्यामुळे रोगप्रितकारशक्तीदेखील वाढते.
पेशींची वाढ
हल्लीच्या काळात लोक वजन वाढण्याच्या भितीने तुप खात नाहीत. पण खरे तर तुपाद हेल्दी फॅट असतात. त्यामुळे शरीरातील पेशींची वाढ होण्यास मदत होते. तसेच शरीरात अस्तित्वात असलेले पोषक तत्व शोषून घेत महत्त्वपूर्ण हार्मोन्स उत्सर्जित करण्याचे कामही तुप करीत असते. त्यामुळे दररोज वरण–भातावर किंवा पोळीवर तुप घ्यायलाच हवे.
बद्धकोष्ठता दूर करते
अनेकांना बद्धकोष्ठतेचा अर्थात कॉन्स्टीपीशनचा त्रास असतो. एका संशोधनानुसार तुपात ब्युटिरिक अॅसीडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. ब्युटिरिक अॅसीड पचनक्रिया सुरळीत करते.
रोगप्रतिकारशक्ती वाढते
कोरोना आल्यापासून डॉक्टर सतत रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा सल्ला देतात. त्यासाठी आपल्या आहारात तुपाचा समावेश आवर्जून करण्याची सूचनाही करतात. तुप खाल्ल्याने संक्रमणाचा धोका कमी होतो. कारण यात असलेले ब्युटिरिक अॅसीड, व्हिटामिन ए आणि सी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.