नवी मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवी मुंबईतील फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्समुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा भारताचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. खारघर येथील फुटबॉल उत्कृष्टता केंद्राचे (Centre of Excellence) उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, तंत्रज्ञान विकसित होत असताना सध्याच्या पिढीची मैदानाशी, मातीशी नाळ तुटत चालली आहे. मात्र या उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून ही नाळ मातीशी पुन्हा जोडली जाईल. आरोग्यदायी जीवनासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. खारघर येथे निर्माण झालेले हे उत्कृष्टता केंद्र नव्या पिढीसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. येथे विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, याहून अधिक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यासाठी नगरविकास विभाग, सिडको यांनी आतापर्यंत केलेले काम निश्चितच अभिनंदनीय आहे.
स्पोर्ट सिटीचा उदय
खारघर हे शहर भविष्यात “स्पोर्टस् सिटी” म्हणून नावारूपाला येईल, यात शंकाच नाही. या ठिकाणी सर्व खेळांसाठीच्या आवश्यक सोयीसुविधा एकाच शहरात ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे सांगून शेवटी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी या मैदानात सराव करणारा भारताचा संघ आंतरराष्ट्रीय पातळीवर विजेता संघाच्या रूपात दिसावा, जागतिक पातळीवर भारताच्या संघाचा दरारा निर्माण व्हावा, अशा शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांनी या प्रकल्पाविषयीची तांत्रिक व प्रशासकीय माहिती उपस्थित मान्यवरांना दिली. तसेच या प्रकल्पाच्या उभारणीसाठी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल सर्व मान्यवरांचे विशेष आभारही मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे या प्रकल्पाचे आभासी उद्घाटन झाले. त्यानंतर या प्रकल्पाच्या निर्मितीबाबतची छोटीशी चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी केले तर आभार प्रदर्शन सिडकोचे अधीक्षक अभियंता रमेश गिरी यांनी केले.
असे आहे खारघरचे उत्कृष्टता केंद्र (Centre of Excellence)-
– उत्कृष्टता केंद्र असलेल्या अत्याधुनिक असा महत्वाकांक्षी प्रकल्प खारघर, नवी मुंबई येथे सिडकोद्वारे विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
– याचे प्रामुख्याने उद्दिष्ट आहे की, भारतातील आगामी प्रतिभावान फुटबॉल खेळाला चालना देणे. जागतिक दर्जाच्या आंतराष्ट्रीय फिफा सामन्यांसाठी 40,000 प्रेक्षक आसन क्षमतेचे फुटबॉलचे स्टेडिअम टप्प्याटप्प्याने उभारण्यात येत आहे.
– या उत्कृष्टता केंद्रासाठी एकूण 10.5 हेक्टर एवढी जागा आहे. जी आंतराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्कच्या 42 दशलक्ष चौरस फूटच्या आवारातच आहे.
– ज्यात वैशिष्टपूर्ण पध्दतीने रहिवासी आणि वाणिज्यिक अशा एकत्रित वापरासाठी विकसित करणे प्रस्तावित आहे.
– प्रस्तावित उत्कृष्टता केंद्र हे मुंबई-पुणे जलदगती मार्गापासून 20 मीटर वाहतुकीच्या अंतरावर आहे.
– भविष्यातील पायाभूत विकसनशील सुविधांच्या निकट आहे. ज्यात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोर, नैना यांचा समावेश आहे. तसेच मुंबई या भारताच्या आर्थिक राजधानी व कला व क्रीडा यांचे केंद्रस्थान असलेल्या शहरापासून फक्त 1 तास वाहतूक अंतरावर आहे.
– अंमलबजावणीच्या सुलभतेसाठी आणि भविष्यातील वापरासाठी हे काम 3 टप्प्यात विभागले आहे.
– पहिल्या टप्प्यात फिफाच्या दर्जाच्या सरावासाठी लागणार्या चार पिचेस (फुटबॉल मैदान) व प्रेक्षकांची गॅलरी ज्यात टेन्साईल रुफ सिस्टीमचा समावेश आहे.
– दुसर्या टप्प्यात सर्व सुविधांनी युक्त अशा सदस्यता प्रकार असलेल्या अॅथलेटिक सुविधांनी युक्त अशा क्लब हाऊसचा समावेश आहे.
– तिसर्या टप्प्यात 40,000 क्षमतेच्या अत्याधुनिक अशा फिफा दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमचा समावेश आहे.
– पहिल्या टप्प्यातील उत्कृष्टता केंद्र असलेल्या वास्तुचा उपयोग व्यावसायिक खेळाडूंना मुख्य सामन्याआधीच्या सरावाकरिता केला जाईल, जे स्टेडिअमच्या बाजूलाच लागून आहे. तसेच राज्य / जिल्हा पातळीवरील सामने, आंतर महाविद्यालयीन सामने तसेच युवा विकास कार्यक्रमाकरिता त्याचा वापर केला जाईल.
– 4 पिच पैकी 3 पिच नैसर्गिक गवताचे असतील व एक पिच कृत्रिम गवताचे असेल. हे सर्व पिच फिफाची तांत्रिक मार्गदर्शक तत्वे वापरुन बनविले जातील. जेणेकरुन फिफाचे आंतरराष्ट्रीय सामने येथे खेळविणे शक्य होणार आहे.
– जागतिक पातळीवर कृत्रिम गवताची मोठया प्रमाणावर स्वीकृती होत असताना, कृत्रिम गवताचे पिच अशा प्रकारे बनविले जाईल की, जेणेकरुन फिफाच्या अति उच्च अशा गुणवत्ता मानांकनात ते गणले जाईल.
– प्रत्येक नैसर्गिक गवताच्या पिचला स्वयंचलित सिंचनाची सुविधा दिला जाईल. 2 लाख लिटर क्षमता असलेल्या भूमिगत पाण्याची टाकी पुरविली जाईल. तसेच फिफाच्या शिफारसी प्रमाणे लागणाऱ्या नाले आणि कुंपणाची व्यवस्था केली जाईल.
– सर्व उत्पादने आणि ब्रँड हे जागतिक दर्जाचे वापरले जातील याकडे खात्रीलायक पध्दतीने लक्ष दिले जाईल. मुख्यत्वे करुन कृत्रिम गवताचे गालीचे हे फिफा ने प्रमाणित केलेल्या सात कंपन्यांपैकी असतील त्यापैकी काही म्हणजे लिमोन्टा, फिल्डटर्फ, डोमो स्पोटर्स ग्रास, ओमेगा इत्यादी.
– प्रत्येक पिचचा आकार 68 × 105 मीटर एवढा असणार आहे आणि तीनही नैसर्गिक पिच वर 500 लक्सचे प्रकाशझोत दिवे लावले जातील, जे फिफाच्या वर्ग- 2 तपशिलाप्रमाणे असतील, जेणेकरून येथे सांघिक आणि क्लब सामने खेळविता येतील.
– जास्तीत जास्त वापराचे अनुमान असलेल्यास पिच क्र. 4 वर कृत्रिम गवताच्या पिचसह 2000 लक्सचे प्रकाशझोत दिवे लावण्यात येतील, जेणेकरून हे सामने दूरदर्शनवर दाखविणे सोयीचे होईल. जे की, फिफाच्या वर्ग – 4 तपशिलाप्रमाणे असतील.
– सरावाच्या 4 पिचेससाठी प्रेक्षक गॅलरी व टेन्साईल रुफ सिस्टीमची बैठक व्यवस्था नियोजित आहे. ज्यात खालच्या बाजूने प्रेक्षकांसाठी स्वच्छतागृह, खेळाडूंची कपडे बदलण्याची खोली, डॉक्टरची खोली, उत्तेजक द्रव्य सेवन नियंत्रण खोली, न्हाणीघर, साठवणुकीची खोली, प्रशासक व माहिती तंत्रज्ञान व्यवस्थेसाठी जागा इत्यादीसाठी केली जाईल.
– बैठक व्यवस्था ही एका वेळेस 4 संघ सहभागी करु शकेल अशा क्षमतेची असेल व वापराप्रमाणे वरील सर्व सुविधांना पुरेसा प्रकाश असेल, असे नियोजन आहे.
– जगातील 12 देशांतील उत्कृष्ट फुटबॉल संघ आशियाई फेडरेशन कॉन्फेडरेशन महिला आशियाई कप 2022 यात सहभागी होत असून हे सामने भारतात अहमदाबाद, भुवनेश्वर आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये होणार आहेत.
– महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये काही सामने खेळविण्यात येणार आहे.
– सिडकोव्दारे विकसित करण्यात येणार्या आंतराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क मध्ये 10.50 हेक्टर क्षे़त्रावर उत्कृष्टता केंद्र प्रकल्प अंतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या नैसर्गिक गवताच्या फुटबॉल मैदानावर वरील सामन्याकरिता सहभागी झालेल्या संघाना सराव करण्याकरिता या मैदानांची निवड वेर्स्टन इंडिया फुटबॉल असोसिएशन शिफारशीद्वारे करण्यात आली असून वरील 02 नैसर्गिक गवताच्या फुटबॉल मैदानावर सिडकोतर्फे वेर्स्टन इंडिया फुटबॉल असोसिएशनला सरावाकरिता विनामोबदला देण्यात येणार आहे.