मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात अन्न पदार्थांच्या भेसळीचा सुळसुळाट असतानाही अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) तक्रारी येत नसल्याची बाब समोर आली आहे. रस्त्यावर तसेच विविध ठिकाणी अन्न पदार्थांची सर्रास विक्री होत आहे. तसेच, पाकीटबंदही अन्नपदार्थ विक्री होतात. अनेकदा या पदार्थांची गुणवत्ता चांगली नसते. मात्र, यासंदर्भात एफडीएला सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीत प्राप्त होत नाहीत.
नागरिकांना भेसळमुक्त अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे १८००-२२२-३६५ या विनामूल्य क्रमांकावर तक्रार करता येते. हा क्रमांक मोठा असल्याने तो नागरिकांच्या लक्षात राहत नाही आणि तक्रारीदेखील अत्यल्प येत असल्याचे निदर्शनास आले. हा क्रमांक बदलण्याच्या सूचना नागरिकांकडून आल्या आहेत. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी हा क्रमांक बदलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लवकरच हा क्रमांक तीन आकडी होणार आहे. तीन आकडी क्रमांक झाल्यावर नागरिकांना अन्न भेसळीविषयी तक्रार करणे सुलभ होणार आहे.