मुंबई – अन्न व औषध प्रशासनाच्या बृन्हमुंबई कार्यालयाने टाकलेल्या छाप्यात निकृष्ट दर्जाचा तेलसाठा जप्त करण्यात आला आहे. कार्यालयास प्राप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मे. महाकाली मसाला, २९, अरिहंत मॅन्शन, केशवजी नाईक रोड, मुंबई ०९ या पेढीची तपासणी केली. तेथे मे. कॅम्पबेल अॅग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि., वसंत वाडी, जामशेत, डहाणू रोड, पालघर यांनी उत्पादित केलेल्या OLIVE POMACE OIL (VITOORIO) चा साठा विक्रीसाठी साठविला असल्याचा आढळला. हा साठा सकृतदर्शनी मिथ्याछाप व कमी दर्जा असल्याच्या संशय आला. त्यावरून तेथून OLIVE POMACE OIL (VITOORIO) चे अन्न नमुने घेण्यात आले. उर्वरित ४४२ लिटरचा साठा (बाजार मूल्य ३ लाख ३१ हजार १९६ रुपये) भेसळ असल्याच्या संशयावरून व्यापक जनहिताच्या दृष्टीने जप्त करण्यात आला आहे.
अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. विश्लेषण अहवाल प्रलंबित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार पुढील योग्य ती कार्यवाही घेण्यात येईल. ही कारवाई श्री.श.रा.केकरे, सह आयुक्त (अन्न),अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई व श्री.रा.दि.पवार, सहायक आयुक्त (अन्न), परिमंडळ १ यांचे मार्गदर्शनाखाली श्री.म.मो.सानप,अन्न सुरक्षा अधिकारी यांनी केली आहे.