इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतातील कोणत्याही राज्यातील पोलिस म्हणजे जनतेचे रक्षक मानले जातात. परंतु काही ठिकाणी पोलिसांची दादागिरी दिसून येते. विशेषतः उत्तर भारतातील इंदर दक्षिण भारतातील काही प्रांतांमध्ये पोलीस कर्मचारी हे सर्वसामान्य जनतेला विनाकारण त्रास देतात, असे दिसून येते. अशीच एक घटना दक्षिणेतील एका राज्यात घडली.
तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे ड्युटीवर असताना एका वाहतूक हवालदाराकडून फूड डिलिव्हरी करणार्याला जबर मारहाण करण्यात आली. या घटनेचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक ट्रॅफिक कॉन्स्टेबल फूड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला थापड मारताना दिसत आहे. आता प्रशासनाने या हवालदारावर कारवाई करत त्याची शहरातील पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली आहे.
सिंगनाल्लूर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल सतीश याने अविनाशी रोडवरील ट्रॅफिक जंक्शनवर डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला थापड मारली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाई केली आणि कॉन्स्टेबलची कंट्रोल रूममध्ये बदली केली.
मोहनसुंदरम असे फूड डिलिव्हरी मॅनचे नाव असून तो गेल्या दोन वर्षांपासून स्विगीमध्ये काम करतो. एका प्रवाशाने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये पोलिस कर्मचार्याने फूड डिलिव्हरी मॅनला दोनदा शिवीगाळ आणि थापड मारताना दिसत असून त्याचा मोबाइल फोन हिसकावून घेत आहे आणि त्याने मोटारसायकलचेही नुकसान केले. मोहनसुंदरम यांनी शहर पोलिस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीच्या आधारे, अधिकाऱ्यांनी ट्रॅफिक कॉन्स्टेबल सतीशला नियंत्रण कक्षात हलवले, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.