इंडिया दर्पण वृत्तसेवा – जीवनात कष्टाशिवाय फळ नाही, असे म्हटले जाते. कोणतेही काम असो, त्यामध्ये कष्ट करावे लागतातच. मग ते शेतीकाम असो अभ्यास असो की, आणखी घरकाम. विशेषतः विद्यार्थ्यांना तर जिद्द चिकाटीने आणि कष्टाने अभ्यास केला तर चांगले यश मिळू शकते. गोर गरीब विद्यार्थी मेहनत घेतात आणि यशाची उंच शिखर गाठतात. अशाच एका तरुणाने छोटे मोठे काम करत असताना यश मिळविले याची सर्वत्र चर्चा होत आहे
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील एका मुलाने कठोर परिश्रम आणि समर्पण नेहमीच फळ देते हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या शेख अब्दुल सतारला आता एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी मिळाली आहे. हे सर्व त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. ही काहनी त्याच्या या अविश्वसनीय प्रवासाची आहे. शेख अब्दुलची कथा अन्य तरूणांचे मनोबल नक्कीच वाढवेल.
शेख अब्दुल सतार यांनी त्यांची कथा त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलवर शेअर केली. त्याने लिहिले, ‘मी एक डिलिव्हरी बॉय असून चांगले यश मिळवणे माझे स्वप्न आहे. मला लवकरात लवकर आर्थिक हातभार लावायचा होता. माझे वडील कंत्राटी कामगार आहेत. मी सुरुवातीला खूप लाजाळू होतो, पण डिलिव्हरी बॉय असल्याने मला खूप काही शिकायला मिळाले.
सतारने पुढे लिहिले की, एके दिवशी मला कोडिंग शिकण्याचा सल्ला मिळाला. माझ्या मित्राने मला एका कोर्सबद्दल सांगितले. मी त्यात सामील व्हावे असा आग्रह धरला. त्यानंतर मी त्यांची सूचना गांभीर्याने घेतली. माझी सकाळची वेळ कोडींग शिकण्यात घालवली. संध्याकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत फुड डिलिव्हरी करत होतो. त्यांच्याकडून मिळालेले पैसे पॉकेटमनी व कुटुंबाच्या छोट्या गरजांसाठी वापरत होतो.
त्यानंतर लवकरच मी स्वतः वेब ऍप्लिकेशन तयार करू शकलो. मी काही प्रोजेक्ट केले. कंपन्यांसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली. यानंतर मला एका आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी मिळाली. मी आता या पदावर आलो याचा मला अभिमान वाटतो, असे शेख अब्दुल सतार सांगतात. माझ्या पगारातून मी माझ्या आई-वडिलांचे ऋण फेडू शकेन. त्यांनी जे काही उसने पैसे घेतले आहेत ते मी लवकरच परत करू शकेन.