नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्न औषध प्रशासनाच्यावतीने (एफडीए) संपूर्ण राज्यात भगर मीलची तपासणी करुन भगरीचे नमुने घेतले जात आहे. आजवर एफडीए ने घेतलेल्या नमुन्यात कुठेही भेसळ झाल्याचे निष्पन्न झालेले नाही. भगरीमध्ये भेसळ होणे शक्य नाही. पीठामध्ये भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा केंद्र सरकारने भगर उत्पादकांना वेठीस न धरता तयार पीठाच्या विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी नाशिक जिल्हा भगर मिल असोसिएशनच्यावतीने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे केली आहे.
नाशिक जिल्हा भगर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. भारती पवारांची भेट घेतली. यावेळी विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. त्यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, भेसळयुक्त पिठामुळे महाराष्ट्रातील काही भागात विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. भगरची प्रक्रिया म्हणजे कच्च्या मालातील अशुद्धता साफ करणे, भुसा काढणे, प्रतवारी करणे आणि पॅकेजिंग करणे इतकीच असते. भगरवर पूर्णपणे स्वच्छतेच्या वातावरणात व कमीतकमी मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रक्रिया केली जाते. संपूर्ण भारतामध्ये सर्वोत्तम आणि स्वच्छता उत्पादनाची पूर्तता करण्यासाठी नाशिकमध्ये आधुनिक मशिनरींनी भगर मील सुसज्ज आहेत. उद्योजक फक्त भगरवर प्रक्रिया करतो आणि कोणतेही पीठ तयार करित नाही. भगरच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही रासायनिक किंवा पाण्याची प्रक्रिया होत नाही आणि म्हणून ते शंभर टक्के नैसर्गिक प्रक्रिया केलेले अन्न आहे. तरीही एफडीए व पोलिस यांच्याकडून भगर मिल धारकांवर दबाव टाकला जातो आहे. तथापी भगरीचे पीठ तयार करणाऱ्यावर काहीही कारवाई केली जात नाही. भगरला सॉफ्ट टार्गेट केले जाते.
नवरात्रीच्या कालावधीत राज्यातील काही भागात अन्नातून विषबाधा झाल्याची प्रकरणे आढळून आली आहेत. या कालावधीत बीड आणि औरंगाबादमध्ये फूड पोयझनिंगच्या घटना घडल्या. प्रथमदर्शनी एफडीए आणि पोलीस विभागाने अशा घटनांना भगर कारणीभूत असल्याची भूमिका घेतली. त्यामुळे गिरणी उत्पादकांवर विविध छापे, जप्ती, छळवणूक, दबाव टाकण्यात आला. महाराष्ट्रातील काही भागात घडलेल्या घटना लक्षात घेता एफडीएने छापे टाकले होते त्यात भगरचे १ हजारहून अधिक नमुने घेतले असले तरी, पीठ किंवा तत्सम पदार्थाचा कोणताही नमुना विभागाकडून घेण्यात आलेला नाही. पिठात भेसळ आढळून आलेल्या घटनांचा इतिहास असूनही त्याचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी पिठाचा एकही नमुना रेकॉर्डवर घेण्यात आलेला नाही. भगर ही भेसळयुक्त आहे. अन्न विषबाधाची प्रकरणे महाराष्ट्राच्या काही भागांत नव्हे तर संपूर्ण भारतात आढळायला हवी होती. मात्र एफडीएने त्याची दखल घेतलेली नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Food and Drug Administration Bhagar Action