पिंपळगाव बसवंत (निफाड) – नाशिक जिल्ह्यासह निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात सन २०१९ वर्षी अतिवृष्टी झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती .या पूरपरिस्थितीमुळे निफाड तालुक्यातील सायखेडा, चांदोरी, आदी गावातील महापुरामुळे नुकसान झालेल्या व्यावसायिकाना शासनाचा वतीने १ कोटी ६७ लाख भरपाई निधी प्राप्त झाल्याची माहिती निफाड विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीप बनकर यांनी दिली.
जुलै व ऑगस्ट सण २०१९ मध्ये नाशिक जिल्ह्यासह निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती .या पूरपरिस्थितीमुळे निफाड तालुक्यातील सायखेडा, चांदोरी, आदी गावातील शेतकऱ्यांच्या शेतीपिका बरोबरच सुमारे ८३ गॅरेज/ उद्योग,३८६ दुकानदार, टपरीधारक हातगाडीधाकर यांचे नुकसान झाले होते. सदर शेतीमालाचे व व्यावसायिकांचे झालेल्या पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते.
पंचनाम्यानुसार शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची सुमारे ९ कोटी ६५ लाख इतकी रक्कम नुकसान बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली परंतु इतर व्यावसायिकाचे पंचनामे होईनाही नुकसान भरपाई मिळत नसल्याने निफाडचे आमदार दिलीप बनकर महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यांना प्रत्यक्ष भेट घेत व पत्रव्यवहार करत नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली.
सदर मागणी मान्य करत नाशिक जिल्ह्यासाठी सुमारे ५ कोटी ४५ लाख इतका निधी प्राप्त झाला असून यात निफाड तालुक्यात झालेल्या नुकसान भरपाईची सुमारे १कोटी ६७ लाख इतकी रक्कम प्राप्त झाली असून लवकरच ती रक्कम संबंधित व्यावसायिकाच्या बँक खात्यात जमा होणार आहे अशी माहिती आमदार बनकर यांनी दिली आहे.