कोल्हापूर – अतिवृष्टीमुळे झालेल्या हाहाकारानंतर पावसाने सलग तिसऱ्या दिवशी उघडीप दिल्याने काहीशी दिलासादयक स्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी अद्यापही ४९ फुटांवर आहे. कोल्हापूर जिल्ह्याकील तब्बल ८४ बंधारे अजूनही पाण्याखालीच असल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूरचा दौरा करणार आहेत. थोड्याच वेळात ते कोल्हापूर शहर, शिरोळ, सांगली, पलूस येथे पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. राधानगरी धरणाचे पाच दरवाजे अद्यापही उघडेच आहेत. त्यातून आठ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. सर्वांना प्रतिक्षा लागून असलेला पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग अद्यापही बंदच आहे. महार्गावर सध्या दीड ते दोन फूट पाणी आहे. महामार्गावरुन वाहणाऱ्या पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे वाहतूक बंदच राहणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आज सकाळीच पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी महामार्गाची आणि तेथील परिसराच्या सद्यस्थितीची पाहणी केली. दुपारनंतर पुन्हा आढावा घेऊन महामार्ग खुला करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.