सांगली – केंद्रीय पाहणी पथकाने अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या आयर्विन पुल, कसबे डिग्रज, मोजे डिग्रज व वाळवा तालुक्यातील शिरगाव येथील शेती पिके, घरे व दुकानांची पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, प्रांताधिकारी समिर शिंगटे, प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोज वेताळ, तहसिलदार डी. एस. कुंभार, अपर तहसिलदार डॉ. अर्चना पाटील, मौजे डिग्रजच्या सरपंच गितांजली इरकर, शिरगावच्या सरपंच दिपाली कणसे तसेच तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.
केंद्रीय पथकाने सांगली शहरातील आयर्विन पुलावरील पाहणी करताना पूर कळात शहरात आलेल्या बाधीत क्षेत्राच्या नकाशाची पाहणी केली. यावेळी महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, सांगली शहर भागात महापुरामुळे व्यापारी वर्ग यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते.
शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये पाणी घुसते. अशी माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यावेळी म्हणाले, कृष्णा नदीला पूर आल्यानंतर सांगली शहर व मुंबई-पुणे-इस्लामपूर यांचा संपर्क तुटतो त्यामुळे मदतीसाठी येणारी कुमक शहरापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे शहराचा संपर्क तुटु नये यासाठी दोन्ही पुलांच्या बाजूचे रस्ते उंच करणे आवश्यक आहे.
मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज व मौजे डिग्रज या गावांची पाहणी केंद्रीय पथकांनी केली. यावेळी प्रांताधिकारी समिर शिंगटे यांनी कसबे डिग्रज गावची लोकसंख्या 13 हजार 241 आहे. त्यामध्ये 1 हजार 291 कुटुंबातील 7 हजार 640 व्यक्ती बाधीत आहेत. त्यापैकी 1 हजार 291 कुटुंबातील 5 हजार 164 व्यक्तींचे विस्तापित झाले आहेत. आज अखेर पंचनाम्यामध्ये 2 पुर्णत: पडझड झालेली घर व अंशत: 160 घरांची पडझड झाली आहे. व्यवसाईक पंचनामे 147 आहेत तर 510 जनावरे स्थलांतरीत करण्यात आली होती.
गावाचे भौगोलिक क्षेत्र 2 हजार 537 हेक्टर असून पिकाखालील क्षेत्र 2 हजार 381 हेक्टर आहे. यापैकी 1 हजार 176 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. अशी माहिती सादर केली. तसेच मौजे डिग्रज गावची लोकसंख्या 4 हजार 993 आहे. त्यामध्ये 743 कुटुंबातील 3 हजार 20 व्यक्ती बाधीत आहेत. त्यापैकी 420 कुटुंबातील 1 हजार 924 व्यक्तींचे विस्तापित झाले आहेत.
आज अखेर पंचनाम्यामध्ये अंशत: 148 घरांची अंशत: पडझड झाली आहे. व्यवसाईक पंचनामे 154 आहेत तर 870 जनावरे स्थलांतरीत करण्यात आली होती. गावाचे भौगोलिक क्षेत्र 1 हजार 97 हेक्टर असून पिकाखालील क्षेत्र 720 हेक्टर आहे. यापैकी 515.36 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. अशी माहिती सादर केली.
वाळवा तालुक्यात शेती व फळ पिकांचे 43 हजार 2 शेतकऱ्यांचे 14 हजार 3130.86 हेक्टर क्षेत्राचे सुमारे 19 कोटी 36 लाख 95 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. शिरगाव येथील 515 शेतकऱ्यांचे 234.61 हेक्टर क्षेत्रावरील ऊस, सोयाबीन, केळी, भाजीपाला आदि पिकांचे नुकसान झाले आहे. अशी माहिती केंद्रीय पथकासमोर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी दिली.
शिरगाव गावच्या सरपंच दिपाली कणसे यांनी पथकासमोर शिरगाव गाव पूरपरिस्थतीत पुर्णपणे बाधीत होत असून या गावातून पूरपरिस्थितीत तातडीने स्थलांतरीत होण्यासाठी वाळवा ते शिरगाव या रस्त्यावर पुलाची आवश्यकता असल्याचे सांगून या गावात पूर काळामध्ये पशुधन स्थलांतरीत करण्यासाठी पुलाची अत्यंत आवश्यकता असल्याचे अधोरेखित केले.
शेतकरी जयंत कणसे यांच्या बाधीत झालेल्या शेताची पाहणी केंद्रीय पथकानी केली यावेळी शेतकरी जयंत कणसे म्हणाले, पूरपरिस्थितीमुळे गेली तीन वर्षे शेतातील पिकाचे नुकसान होत आहे. सध्यस्थितीत शेतात उभा असलेला ऊस आठ दिवस पुर्णपणे पाण्याखाली असल्याने तो पुर्ण नष्ट झाला आहे. त्याबरोबर केळीच्या बागाही उध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे शासनाकडून याबाबत योग्य नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आर्थिक सल्लागार रवनिष कुमार, नागपूर येथील जलशक्तीचे अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे, नवी दिल्ली येथील ऊर्जा विभागाच्या उपसंचालक श्रीमती पूजा जैन, मुंबई येथील रस्ते परिवहन विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र चापेकर, उपायुक्त प्रताप जाधव सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.