नवी दिल्ली, 24 जुलै 2021
महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा या सात शहरांमध्ये ज्या उमेदवारांची परीक्षा केंद्रे आहेत, आणि जे विद्यार्थी तिसऱ्या टप्प्यातल्या परीक्षेसाठी या केंद्रांवर जाऊ शकत नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याची सूचना एनटीए- म्हणजेच राष्ट्रीय चाचणी यंत्रणेला दिली आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज ट्विटर वरुन दिली.
https://twitter.com/dpradhanbjp/status/1418928759974027267
कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, रत्नागिरी या शहरांमध्ये ज्यांची परीक्षा केंद्रे आहेत, असे विद्यार्थी सद्य परिस्थितीत कदाचित उद्या म्हणजेच 25 आणि 27 जुलैला होणाऱ्या परीक्षांसाठी जाऊ शकणार नाहीत, मात्र म्हणून त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.त्यांना परीक्षेसाठी पुन्हा एक संधी दिली जाईल आणि या पर्यायी तारखा एनटीए लवकरच जाहीर करेल,असे प्रधान यांनी सांगितले.
एनटीएच्या (www.nta.ac.in) संकेतस्थळाकडे (jeemain.nta.nic.in) लक्ष देत राहावे, त्यावर त्यांना परीक्षेविषयीची ताजी माहिती मिळू शकेल, असा सल्लाही या सर्व परीक्षार्थींना देण्यात आला आहे.
सविस्तर माहिती आणि स्पष्टीकरणासाठी JEE (Main) – 2021 चे परीक्षार्थी 011-40759000 या क्रमांकावर अथवा jeemain@nta.ac.in या ईमेलवर संपर्क साधू शकतात.