पुणे – सणासुदीचे दिवस असल्याने बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची फ्लिपकार्टच्या नुकत्याच झालेल्या सेलमध्ये ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. आता वार्षिक बिग बिलियन डे च्या विक्रीनंतर फ्लिपकार्ट पुन्हा दिवाळीच्या सणानिमित्त आणखी एक सेल आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. ई-कॉमर्स मेजरने याला बिग दिवाळी सेल असे म्हटले आहे.
या सेल कालावधीत मोबाईल, टॅब्लेट, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर काही आकर्षक सूट देण्याचे आश्वासन फ्लिपकार्टने दिले आहे. फ्लिपकार्टचा हा बिग दिवाळी सेल दि. १७ ते दि.२३ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. तसेच फ्लिपकार्ट प्लस सदस्यांसाठी दि. १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून विक्री लवकर सुरू होईल.
कंपनी आयसीआयसीआय बँक व अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड धारकांना १० टक्के त्वरित सूट देणार आहे. फ्लिपकार्ट विक्री कालावधी दरम्यान आणखी मोठी सूट देण्याची शक्यता आहे. ई-कॉमर्स कंपनीच्या नवीन वेबपेजनुसार, बिग दिवाळी सेल स्मार्टफोन आणि टॅब्लेटवर ८० टक्के सूट देईल. तसेच, इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजवर ८० टक्के सूट मिळेल, तर टीव्ही आणि उपकरणांवर ७५ टक्क्यांपर्यंत सूट राहील, असा अंदाज आहे.
क्रेझी डिल्स नावाची एक कॅटेगिरी असणार आहे. या डिल्स दुपारी १२ वाजता, सकाळी ८ वाजता आणि दुपारी ४ वाजता ग्राहकांसाठी उपलब्ध होतील. याशिवाय टाइम बॉम्ब नावाची एक कॅटेगरी असेल. त्यात सायंकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत प्रत्येक तासाला एक नवी डील दिसणार आहे. या डिल्स ग्राहकांसाठी अत्यंत आकर्षक आणि बंपर सूट देणाऱ्या राहतील, अशी माहिती देण्यात आली आहे.