मुंबई – वॉलमार्टच्या नेतृत्वाखालील फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपनी लवकरच महाराष्ट्रात चार नवीन सुविधा केंद्र उघडणार आहे. यामुळे ४ हजार लोकांना रोजगार मिळेल. कंपनीची ही नवीन गुंतवणूक राज्यातील ई-कॉमर्स क्षेत्रात ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत करेल. तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला उत्तेजन देण्यास मदत होईल.
कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही पूर्तता आणि वर्गीकरण केंद्रे भिवंडी आणि नागपूर येथे असतील. यामुळे राज्यातील स्थानिक विक्रेत्यांना आधार मिळेल आणि ई-कॉमर्स क्षेत्राची वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत होईल. या सुविधा ७ लाख चौरस फूट क्षेत्रात होणार असून यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ४००० रोजगार निर्माण होतील.
कंपनीने पुरवठा साखळीच्या दृष्टीने महाराष्ट्राचे प्रमुख केंद्र म्हणून वर्गीकरण केले आहे. या नवीन सुविधा आणि विद्यमान सुविधांच्या विस्तारामुळे राज्यातील फ्लिपकार्ट पुरवठा साखळीच्या सुविधांची संख्या १२ वर गेली आहे. तसेच या सुविधा २३ लाख चौरस फूट क्षेत्रात पसरलेल्या आहेत. यापैकी २० हजारांपेक्षा जास्त लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कार्यरत आहेत.
फ्लिपकार्टने २६,८०० कोटी रुपये उभारले, कंपनीचे मूल्यांकन आयपीओपूर्वी इतके झाले आहे. फ्लिपकार्टने म्हटले आहे की, गेल्या वर्षभरात राज्यात विक्रेत्यांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली आहे. दरम्यान, फ्लिपकार्टच्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याच्या निर्णयाचे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वागत केले आहे.