मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वप्नवत भासणारी विमानवारी आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येत आहे. त्याचवेळी विमानात प्रवाशांच्या गैरवर्तणुकीचे प्रकारही सातत्याने पुढे येत आहेत. अलिकडेच महिला प्रवाशावर अन्य प्रवाशाने लघुशंका केल्याचे प्रकरण पुढे आले हेते. त्यानंतर एका प्रवाशाने विमान थांबण्यापूर्वीच इमर्जंसी गेट उघडण्याचा प्रयत्न केला गेला होता. आता एका प्रवासी महिलेने विमानात धिंगाणा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
४५ वर्षीय महिला प्रवासी पाओला पेरुशियो हिला चालत्या विमानात गोंधळ घातल्याप्रकरणी मुंबई सहारा पोलिसांनी अटक केली. ही महिला इटलीची असल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्यावर क्रू मेंबर्सना मारहाणीचाही आरोप असून या प्रकारानंतर तिने स्वतःचे कपडेही काढले असल्याची तक्रार विमानातील क्रू मेंबर्सने मुंबई पोलिसांकडे केली होती. एअर विस्ताराच्या अबूधाबी-मुंबई विमानात हा प्रकार घडला.
बिझनेस क्लासचा हट्ट
मध्यरात्री जवळपास अडीच वाजताच्या सुमारास विमानाच्या इकोनॉमी क्लासमध्ये बसलेली ही महिला अचानक उठली आणि बिझनेस क्लासमध्ये जाऊन बसली. केबीन क्रूच्या सदस्यांनी तिला दोनवेळा आपल्या सीटवर जाऊन बसण्याची सूचना केली. कोणती मदत हवी आहे का? अशीही विचारणा केली. पण महिला प्रवाशाने कोणतेही उत्तर दिले नाही. मूळ सीटवर जाण्यासही विरोध करीत आरडाओरड सुरू केली.
सहप्रवाशांना त्रास
विमानाच्या महिला क्रू मेंबर्सने महिला प्रवाशाला काही गैर करण्यापासून अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महिला प्रवाशाने एका क्रू मेंबरच्या चेहऱ्यावर ठोसा मारला. यात क्रू मेंबरला जबर दुखापत झाली. त्यानंतर तिने स्वत:चे कपडे काढण्यास सुरुवात केली आणि आरडाओरडा करू लागली. बराच वेळ विमान प्रवासात हा हंगामा सुरू होता. झोपेत असणाऱ्या अन्य प्रवाशांना या प्रकाराने त्रास सहन करावा लागला. पुढे पहाटे ४.५३ मिनिटांनी विमान मुंबई विमानतळावर लँड झाले. त्यापूर्वीच घटनेची माहिती विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. सुरक्षा अधिकाऱ्यांनी महिलेला ताब्यात घेत मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर महिला प्रवाशाविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.
Flight Women Abu Dhabi High Voltage Drama