नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- देशातील १३५ प्रवाशांची आसनक्षमता असलेली पहिली फ्लॅश-चार्जिंग इलेक्ट्रिक एसी सार्वजनिक बस लवकरच नागपुरात प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाईल. सुरुवातीला ही सेवा रिंग रोडच्या मार्गांवर सुरू होईल आणि नंतर शहराच्या इतर मार्गांवर तिचा विस्तार केला जाईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
ते म्हणाले की, एक काळ असा होता जेव्हा नागपूर आणि विदर्भातील इतर प्रदेश मागासलेले मानले जात होते. मात्र आता अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे शहरात जागतिक केंद्र बनण्याची क्षमता आहे. शुक्रवारी नागपूरमध्ये गडकरी यांनी नागपूर-अमरावती एनएच ५३ वरील २.८५ किमी लांबीचा नवीन ४-लेन ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपुलाचे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, हा पूल १९१ कोटी रुपये खर्चाने तयार करण्यात आला आहे. हा उड्डाणपूल अमरावती रोडवरील भोले पेट्रोल पंप चौकाला नागपूर विद्यापीठ कॅम्पस चौकाशी जोडतो, ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवासाचा वेळ वाचेल.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, नवीन रिंग रोड आणि उड्डाणपूल प्रकल्पांचा प्रस्ताव आहे. शहरात वाहतूक कोंडी निर्माण करणाऱ्या घाऊक बाजारपेठांनाही जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असलेल्या नव्या, आधुनिक ठिकाणी हलवण्याची योजना आहे.
यावेळी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी पायाभूत सुविधांच्या उपक्रमांबद्दल माहिती दिली आणि काटोल येथे राज्याचा सर्वात मोठा संत्रा प्रक्रिया फूड पार्क उभारण्याची घोषणा केली. यावेळी महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल आणि इतर मान्यवरही उपस्थित होते.