नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. केंद्रापासून ते राज्य सरकारपर्यंत विविध कार्यक्रम, योजनांच्या माध्यमातून अमृत महोत्सवाचा आनंद साजरा करत आहेत. दरम्यान, तिरंगा विकत घेण्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याचा दावाही विविध स्तरातून केला जात आहे. भाजप नेते आणि खासदार वरुण गांधी यांनी अशी सक्ती लज्जास्पद असल्याचे म्हटले असून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव गरिबांवर भार ठरु नये असे म्हटले आहे. त्यामुळे आपल्याच पक्षाच्या आवाहनाला घरचा आहेत गांधींनी दिल्याचे दिसून येत आहे.
वरुण गांधींनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओला अनुसरुन ते म्हणतात, “स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षाचा उत्सव आनंदाचा आहे. परंतु तो गरीबांवर बोजा झाला तर ते दुर्दैवी असेल. शिधापत्रिकाधारकांना तिरंगा खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे किंवा त्याऐवजी त्यांच्या रेशनमधील वाटा कापला जात आहे. प्रत्येक भारतीयाच्या हृदयात वसलेल्या तिरंग्याच्या किंमतीवर गरिबांची गळचेपी करणे लज्जास्पद आहे.” या व्हीडिओत लोकं जेव्हा रेशन घेण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांना रेशन कोटा व्यापाऱ्याने जबरदस्तीने २० रुपयांना तिरंगा खरेदी करण्यास भाग पाडल्याचे दिसत आहे.
पैसे नसले तर २० रुपयांचा गहू त्यांच्या वाट्याने कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. व्हीडिओमध्ये लोकांनी तसा दावाही केला आहे. ही परिस्थिती निश्चितच लज्जास्पद असल्याचे वरुण गांधींनी म्हणले आहे. ट्विटरच्या माध्यमातून या प्रश्नाला गांधींनी वाचा फोडली आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या असून स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करण्यासाठी गरिबांची हेळसांड केली जाऊ नये अशा भावना लोकं व्यक्त करत आहेत.
https://twitter.com/varungandhi80/status/1557219024949235713?s=20&t=JFHW5CkF2m4qhayVk_zocg
Flag Purchase Compulsion Poor Peoples Varun Gandhi Video
Amrit Mahotsav Indian Tricolor