अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
UPSC ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. या परीक्षेत एखाद्याला पहिल्याच प्रयत्नात यश मिळते तर कुणाला वर्षानुवर्षे कष्ट करावे लागतात. आयएएस सौरव पांडे यांची कथाही अशीच आहे. खडतर मार्गाने प्रवास करत त्यांनी यश मिळवले आहे.
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे राहणारे सौरव पांडे यांच्यासाठी यूपीएससीचा मार्ग खडतर होता. पण इच्छित स्थळी पोहोचण्याचा निश्चय त्यांनी केला. नागरी सेवा परीक्षेत एक-दोन नव्हे तर सलग पाच वेळा नापास होऊनही त्यांनी हार मानली नाही. पूर्ण समर्पणाने आपला अभ्यास सुरू ठेवला आणि २०१९ मध्ये UPSC परीक्षेत ६६वा क्रमांक मिळविला. त्याला सहाव्यांदा हे यश मिळाले.
सौरव अभ्यासात नेहमीच हुशार होते. BITS पिलानी या शैक्षणिक संस्थेमधून पदवी घेतल्यानंतर लगेचच त्यांनी नोकरीला सुरुवात केली. मात्र, काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले. सौरवला आधीच कल्पना होती की त्याला यूपीएससीसाठी खूप मेहनत करावी लागेल. त्यामुळे संपूर्ण तयारीनेच त्यांनी निर्णय घेतला होता.
सौरवने २०१४ मध्ये पहिल्यांदा नागरी सेवा परीक्षा दिली होती. लागोपाठ तीन प्रयत्नांतही ते पूर्वपरीक्षा पास करू शकला नाही. यूपीएससीसाठी अधिक मेहनत घ्यावी लागते हे त्यांच्या लक्षात आले. सौरवने अभ्यासाच्या पद्धतीतही काही बदल केले. मेहनत करूनही चौथ्या आणि पाचव्या प्रयत्नात मेन क्लिअर करूनही त्याची निवड होऊ शकली नाही. अखेर सहाव्या प्रयत्नात केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले आणि त्याने आपले स्वप्न साकार केले.
यूपीएससीची तयारी करताना तुम्हाला अनेक संघर्षांना सामोरे जावे लागू शकते, असे सौरवचे मत आहे. अशा वेळी निराश होण्याऐवजी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. तुम्ही अयशस्वी झालात तर त्यातून काहीतरी शिकून स्वतःला सुधारायला हवे. ते म्हणतात की यूपीएससी परीक्षेचा प्रत्येक प्रयत्न हा शेवटचा प्रयत्न मानला पाहिजे. तथापि, एक बॅकअप योजना देखील तयार ठेवा, असेही ते सांगतात.