मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या आशा सेविकांची मुंबईत साडेपाच हजार पदे भरण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. हा निर्णय घेऊन शिंदे – फडणवीस सरकारने काम करणारे सरकार कसे असते हे दाखवून दिले आहे, असेही चित्र वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
कोरोना आणि गोवर प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरात आरोग्य व्यवस्था आणखी कार्यक्षम करण्यासाठी ५ हजार ५०० आशा सेविकांची नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात नुकताच जाहीर केला आहे. मुंबई महानगरात गोवर प्रसारात आरोग्य सर्वेक्षणाच्या त्रुटी आढळून आल्या होत्या. या त्रुटी दूर करण्यासाठी शिंदे – फडणवीस सरकारने साडे पाच हजार आशा सेविकांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे, असेही श्रीमती वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे .
श्रीमती वाघ यांनी म्हटले आहे की, मुंबई महानगराच्या वैद्यकीय व्यवस्थेत आशा सेविकांचे काम महत्वाचे आहे. कोरोना काळात आशा सेविकांनी केलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. संसर्गजन्य तसेच विविध आजारांचे निदान करणे, लसीकरण कार्यक्रम, लहान मुले आणि गर्भवती मातांचे आरोग्य जपण्यासाठीचे उपक्रम यात आशा सेविकांचे काम महत्वाचे असते, हे ओळखून शिंदे फडणवीस सरकारने साडेपाच हजार आशा सेविकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सामान्य जनतेला मिळणाऱ्या आरोग्य सुविधांचा दर्जा आणखी सुधारण्यास मदत होणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात धोरण लकव्यामुळे जनतेच्या हिताचे निर्णय होत नव्हते. शिंदे – फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर जनतेच्या हिताचे निर्णय वेगाने घेतले जात आहेत.
Five Thousand Asha Worker Recruitment in Mumbai