निवडणूक निकालाचा अन्वयार्थः
लोकसभा २०२४कडे पाहताना
अखेर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड, गोवा या राज्यांच्या निवडणुकांकडे २०२४च्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात होते. यात पंजाब सोडून बाकी सर्व राज्ये भारतीय जनता पक्षाने जिंकली आहेत. उत्तर प्रदेशात भाजपने जवळपास ५० जागा गमावल्या आहेत. पंजाबमध्ये भाजपला आधी तीनच जागा होत्या, त्यातली एक कमी झाली आहे. शेतकरी आंदोलनामुळे पंजाबमध्ये भाजपला यश मिळणे मुळातच कठीण होते. पंतप्रधानांनी पंजाबची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनी आक्षेप घेतलेले वादग्रस्त कायदे मागे घेतले खरे, परंतु त्याचा काहीही फायदा भाजपाला झालेला नाही. गोव्यात मात्र सात जास्त जागा मिळवून भाजप सत्तेच्या जवळ आले आहे.
उत्तर प्रदेशातला विजय भाजपसाठी स्वागतार्ह असला तरी २०१७चे चित्र बदलले आहे. अखिलेश सिंग यांनी सव्वाशेच्या आसपास जागा मिळवल्या आहेत. बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेस हे पक्ष नावालाच उरले आहेत. ही बदलती परिस्थिती भाजपने लक्षात घ्यायला हवी आणि आधीच्या चुका टाळायला हव्यात. १९८५ नंतर प्रथमच सत्ताधारी पक्ष उत्तर प्रदेशात पुन्हा सत्तेवर आला आहे. याबद्दल भाजप अभिनंदनास पात्र असला तरी त्यांना कामात सुधारणा करावी लागेल असेच उत्तर प्रदेशच्या जनतेने त्यांना सांगितले आहे. गुरुवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या मुख्यालयासमोर कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केले. उत्तर प्रदेशातल्या विजयाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता, ते स्वाभाविक म्हटले पाहिजे. विरोधी पक्षांवर त्यांनी केलेली घणाघाती टीका ही सुद्धा समजू शकतो. पुढील काळात भाजप, ‘आप’, समाजवादी पक्ष, तृणमूल पक्ष (तृणमूलने गोव्यात दोन जागा जिंकल्या आहेत) यांची दिशा काय असेल हे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसपुढे मात्र अंधार आणखी गडद होत आहे.
पंजाबमध्ये ‘आप’चा विजय ऐतिहासिक आहे. ज्या राज्यावर अकाली दल, काँग्रेस आदी पक्षांनी प्रदीर्घ काळ राज्य केले तिथे इतके भव्य यश मिळवणे (सध्याच्या आकडेवारीनुसार ‘आप’ने ११७ पैकी ९२ जागा जिंकल्या आहेत) हे सोपे काम नाही. इतर राज्यांच्या तुलनेत पंजाबची जडणघडण, तेथील सामाजिक, राजकीय प्रश्न अगदी वेगळे आहेत. राजकीय भांडणात शेवटी मतदार शहाणा ठरतो हा अनुभव भारताने १९७७ पासून घेतला आहेच. यंदा त्याचे प्रत्यंतर पुन्हा पंजाबमध्ये आले. अमरिंदर सिंह याना मुख्यमंत्रीपदावरून काढून टाकणे, चरणजित सिंह चन्नी यांच्याकडे ते पद देणे, नवज्योतसिंह सिद्धू यांना ‘सहन’ करणे, पक्षात जाहीर वाद घालणे यामुळे काँग्रेसने आपल्या पायावर धोंडा पडून घेतलाच होता. आता मतदारांनी काँग्रेसला अखेरचे पाणी पाजले एवढेच!
‘आप’ने काही वर्षांपूर्वी दिल्ली विधानसभा जिंकल्यावर ते फक्त दिल्लीपुरतेच मर्यादित राहतील असे म्हटले जात होते. आज त्यांनी तो समज खोटा ठरवून पंजाब जिंकले आहे. ‘आप’ने पंजाबमधून २०१४ची लोकसभा निवडणूक जिंकली होती. त्यावेळी त्यांना ३३ विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली होती. २०१७च्या विधानसभा निवडणुका त्यांनी लढवल्या आणि २० जागा जिंकल्या. ही कामगिरी त्यांचा भ्रमनिरास करणारी होती. ती कसर त्यांनी आज भरून काढली. अनेक दिग्गजांना ‘आप’च्या अगदी सामान्य कार्यकर्त्यांनी पराभूत केले. भदौर मतदारसंघातून मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी उभे होते. त्यांना लाभसिंह उघोके या मोबाईल दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीने हरवले. लाभसिंह यांचे वडील वाहन चालक आहेत. मतदारांनी चन्नी यांच्याऐवजी उघोके यांच्यावर विश्वास ठेवला ही बाब खूप बोलकी आहे. चन्नी यांना चमकौर मतदारसंघातून चरणजित सिंह याच नावाच्या डॉक्टरने हरवले. अमरिंदर सिंह याना अजितपाल सिंह कोहली नावाच्या एका उद्योजकाने पतियाळा मतदारसंघातून हरवले. कोहली आधी अकाली दलात होते, निवडणुकीपूर्वी ‘आप’मध्ये आले. काँग्रेसमधून ‘आप’मध्ये आलेल्या गुरमीत सिंह खुडियां यांनी प्रकाशसिंह बादल यांचा पराभव केला. जीवनज्योत कौर या महिलेने तर अमृतसरमधून काँग्रेसचे नवज्योतसिंह सिद्धू आणि अकाली दलाचे विक्रम मजिठिया या दोन दिग्गजांना हरवले. जगदीप कंभोज यांनी माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल याना हरवले. पंजाब आणि ‘आप’साठी ही निवडणूक ऐतिहासिक आहे ती याही कारणांमुळे. पुढची वाटचाल मात्र त्यांना सोपी नसेल. प्रचारादरम्यान दिलेली आर्थिक आश्वासने त्यांना पूर्ण करावी लागतील. पंजाबसारखे अनेक अर्थानी अवघड असलेले राज्य सुरळीत चालवावे लागेल.
पाचपैकी चार राज्ये जिंकून आपण २०२४च्या लोकसभा निवडणुकीतील विजय निश्चित केला आहे, असे मात्र भाजपने गृहीत धरू नये अशी देशातली सध्याची राजकीय परिस्थिती आहे.