मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
उत्तर प्रदेश , पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. पंजाब वगळता उत्तर प्रदेशमध्ये, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यामध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने मुसंडी मारली आहे. चारही राज्यात भाजप सत्ता कायम ठेवणार असल्याने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा कायम असल्याचे दिसून येत आहे. या वेळी उत्साही भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला आहे. मात्र, काँग्रेसचा सुफडा साफ झाला आहे. पाचही राज्यांमध्ये काँग्रेसची कामगिरी लक्षणीयरित्या खालावली आहे.
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशात ४०३ जागांसाठी सकाळी मतमोजणी सुरू झाली. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीचे कल भाजपच्या बाजूने होते. समाजवादी पार्टी दुसऱ्या क्रमांकावर होती. काँग्रेस आणि बसपामध्ये चुरस पाहायला मिळत आहे. भाजपने एग्जिट पोलचे निष्कर्ष खरे ठरवत जोरदार मुसंडी मारली आहे. उत्तर प्रदेशात एकूण सात टप्प्यात मतदान झाले आहे. एग्जिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. तो आता खरा ठरताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ७० हजार पोलिस कर्मचारी तसेच २४५ तुकड्या निमलष्करी दल आणि ६९ तुकड्या पीएसी जवान तैनात आहेत. संवेदनशील मतदारसंघात व्हिडिओग्राफी करण्यात येत आहे.
आतापर्यंतचे अपडेटस असे
भाजप – २७०
समाजवादी पार्टी – १२५
बहुजन समाज पार्टी – ४
काँग्रेस – २
पंजाब
पंजाबमधील ११७ जागांसाठी सकाळपासून मतमोजणी सुरू झाली. २०१७ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये टक्कर देत सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या आम आदमी पार्टीने या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला धोबीपछाड दिला आहे. काँग्रेसअंतर्गतच्या बंडखोरीमुळे कंटाळलेल्या जनतेने यंदा आपला संधी देण्याचा निश्चय केल्याचे दिसून आले आहे. सकाळी सुरू झालेल्या मतमोजणीत सुरुवातीला आप आणि काँग्रेसमध्ये चुरस पाहायला मिळाली होती. परंतु काँग्रेसला मागे टाकून आप सर्वात मोठा पक्ष ठरला असून, पक्षाने एकहाती बहुमत मिळवले आहे.
आतापर्यंतचे अपडेटस असे
आम आदमी पार्टी – ९०
काँग्रेस- १७
अकाली दल- ६
इतर – ४
गोवा
गोव्यातील ४० विधानसभाक्षेत्रासाठी सत्ताधारी भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज करणार असल्याचे चित्र आहे. सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यात खरी लढत पाहायला मिळाली. ४० जागांसाठी तब्बल ३०२ उमेदवार रिंगणात असल्याने सर्वच ठिकाणी बहुपक्षीय सामना पाहायला मिळाला आहे.
आतापर्यंतचे अपडेटस असे
भाजप – १८
काँग्रेस – ११
एमएजी – ४
इतर – ७
उत्तराखंड
उत्तराखंडमधील ७० विधानसभा जागांसाठी सकाळी मतमोजणी सुरू झाली. आत्तापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर काँग्रेस आणि इतर पक्ष पिछाडीवर पडले आहेत. सध्याच्या कलानुसार भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यास सज्ज झाला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे.
आतापर्यंतचे अपडेटस असे
भाजप – ४४
काँग्रेस – २२
आप – ०
इतर – ४
मणिपूर
६० विधानसभा मतदारसंघांसाठी मणिपूरमध्ये २८ आणि ५ मार्च अशा दोन टप्प्यात मतदान झाले. मुख्यमंत्री एन. बिरेंद्र सिंह यांच्यासह विधानसभा अध्यक्ष वाय. खेमचंद टी. एच. विश्वजित आणि टी. एच. राधेश्याम असे दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात होते. मतमोजणी सकाळी सुरू झाली, सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
आतापर्यंतचे अपडेटस असे
भाजप – २२
एमपीएसए – ३
एनपीईपी – ६
इतर – १०