नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई द्वारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार मार्फत फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबीर वाहनाचा शुभारंभ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या.आर.एस.तिवारी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
जिल्हा न्यायालय, नंदुरबार येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश आर.जी.मलशेट्टी, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एस.टी.मलिये, मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही.जी.चव्हाण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डि.व्ही.हरणे, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व्ही.एन.मोरे, आर. एन. गायकवाड, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती.वाय.के.राऊत, एन.बी.पाटील, जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष पी.बी.चौधरी, ॲड.शारदा पवार, ॲड.आर.डी.गिरासे इतर विधिज्ञ व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
फिरते लोकअदालत वाहनामार्फत जिल्ह्यातील निवडक तालुक्यात फिरुन न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तसेच बँकांचे, विमा कंपनी, विद्युत महामंडळ, बीएसएनएल व इतर दिवाणी दाखलपुर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना लोकअदालतीचे व विधी सेवाविषयी कायदेविषयक मार्गदर्शनही केले जाणार आहे.
तालुकानिहाय त्यांचा दौरा कार्यक्रम असा 13 जुलै 2022 रोजी रनाळे ता.जि.नंदुरबार येथे पोलीस ठाणेच्या प्रांगणात फिरते लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तर तालुका विधी सेवा समिती मार्फत नवापूर येथे 14 व 15 जुलै 2022 रोजी. अक्कलकुवा येथे 16 व 17 जुलै 2022 रोजी. तळोदा येथे 18 व 19 जुलै 2022 रोजी तर शहादा येथे 20 व 21 जुलै 2022 रोजी फिरते लोकअदालतीचे व विधी सेवेचे कायदेविषयक शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. आज या उद्घाटनपर कार्यक्रमानंतर नंदुरबार तालुक्यातील टोकरतलाव येथे कायदेविषयक शिबीर व विधी सेवेचा कार्यक्रम संपन्न झाला. तरी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Firte Lok Adalat Vehicle legal dispute solve