येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – या वर्षातील पहिले चंद्रग्रहण शुक्रवारी ५ मे रोजी होणार आहे. याच दिवशी बुद्ध पौर्णिमाही आहे. हे चंद्रग्रहण तूळ राशीत आणि स्वाती नक्षत्रात होणार असून ते रात्री ८ वाजून ४४ मिनिटांपासून ते मध्यरात्री १ वाजून २ मिनिटांपर्यंत राहणार आहे. या चंद्रग्रहणाचा कालावधी सुमारे ४ तास १४ मिनिटांचा असणार आहे. चंद्रग्रहणाचा वेधादि कालावधी ९ तासांपूर्वी सुरू होतो, परंतु हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा वेधादि कालावधी पाळण्याची आवश्यकता नाही.
हे एक उपछाया चंद्रग्रहण आहे, याचा अर्थ या चंद्रग्रहणामध्ये पृथ्वीची सावली चंद्राच्या फक्त एका बाजूला राहते, त्यामुळे हे ग्रहण सर्व ठिकाणी दिसणार नाही. २०२३ वर्षातील पहिले चंद्रग्रहण तीन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. तर त्या भाग्यवान राशी= मिथुन, सिंह, मकर या तीन राशी आहेत.
यासंदर्भात नाशिक जिल्ह्यातील येवला येथील प्रसिद्ध पंचांग अभ्यासक पं.डाॅ. प्रसादशास्त्री कुळकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार,
वैशाख पौर्णिमा अर्थात शुक्रवार दिनांक ५ मे २०२३ रोजी होणारे चंद्रग्रहण हे ‘छायाकल्प’ स्वरुपाचे असणार आहे. छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र बिंबास प्रत्यक्ष ग्रहण न लागता चंद्रबिंब फक्त पृथ्वीच्या अंधुक, अस्पष्ट व धूसर छायेत प्रवेश करत असते. हे छायाकल्प स्वरूपात चंद्रग्रहण भारतात दिसणार असून चीन, कझाकस्तान, उझबेकिस्तान, इराक, इराण, सौदी अरेबिया, ओमान, पाकिस्तान , म्यानमार, थायलंड, रशिया, जपान, सिंगापूर, इजिप्त इ. ठिकाणी देखील ‘छायाकल्प’ स्वरुपातच दिसणार आहे.
हे ग्रहण आशिया , आफ्रिका , युरोप , रशिया , आस्ट्रेलिया खंड या प्रदेशात यथावत दिसेल. छायाकल्प ग्रहणाचे कोणतेही वेधादि नियम पाळू नयेत असे असल्यामुळे या ग्रहणाचे नैसर्गिक व जन्मराशी इत्यादीनुसार होणारे परिणाम विचारात घ्यायचे नसतात.
त्याचप्रमाणे भारतातील व भारताबाहेरील सर्व व्यक्तींनी व सर्व गर्भवती स्त्रियांनी देखील ५ मे २०२३ या दिवशी होणाऱ्या छायाकल्प चंद्रग्रहणाचे कोणतेही वेधादि नियम व धार्मिक नियम पाळू नयेत;असे पं.डाॅ. प्रसादशास्त्री कुळकर्णी यांनी सांगितले.
First Lunar Eclipse of This Year Tradition India Follow