नवी दिल्ली
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर भारताला अँटीबॉडी वाढविण्याचे औषध मिळाले आहे. रोशे इंडियाच्या दोन औषधांच्या मिश्रणाला (कॉकटेल) कोरोनाच्या उपचारादरम्यान आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सौम्य आणि मध्यम संसर्गाच्या व्यक्तीला गंभीर होण्यास हे औषध रोखते, असा दावा करण्यात आला आहे.
केंद्रीय औषधे मानक नियंत्रण संघटनेकडून (सीडीएससीओ) अँटीबॉडी कॉकटेल औषधच्या वापराला मंजुरी देण्यात आल्याचे रोशे इंडियातर्फे बुधवारी सांगण्यात आले. भारतातील औषध निर्माण कंपनी सिप्लासोबत मिळून रोशे इंडिया औषधे आयात करून वितरण करणार आहे. रोशे इंडियाकडून अद्याप औषधाच्या किमतीबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
रोशे इंडियाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, त्यांच्या कॅसिरिविमॅब आणि इमदेविमॅब या दोन औषधांना भारतात वापरण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. अमेरिकेत मिळालेल्या मंजुरीनंतर आणि युरोपीय युनियनच्या औषध उत्पादान समितीच्या आधारावर ही मंजुरी देण्यात आलेली आहे. १२ वर्षांहून अधिक मुलांसह (वजन किमान ४० किलो हवे) वयस्कांना सौम्य आणि मध्यम कोरोनाचा संसर्ग झाल्यास या अँटीबॉडी कॉकटेलचा वापर करता येईल. कोरोनाबाधित गंभीर झाल्यास या औषधाचा गुण येईल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
कोरोनाविरोधात लढा देताना जी काही मदत आवश्यक आहे ती करण्यास कटिबद्ध आहे, असे रोशे फार्मा इंडियाचे व्यवस्थापक वी. सिम्पसन इमॅन्युअल यांनी सांगितले. या औषधाने रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज कमीच भासेल. रोशे इंडियासोबत कोरोना विषाणूविरोधातील लढ्यात आमची भागिदारी महत्त्वपूर्ण आहे, असे सिप्लाचे व्यवस्थापकीय संचालक उमंग व्होरा म्हणाले.