नाशिक – व्दारका परिसरातील संतकबीर नगर झोपडपट्टीत झालेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आगीत शब्बीर बेग, रज्जाक शेख, बबलु बेग, सलिम शेख यांचे घर पूर्णपणे खाक झाले आहे. या स्फोटात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे तेरा बंब घटनास्थळी दाखल झाले. पण, झोपडपट्टीमधील दाट वस्तीमुळे अग्निशमन दलाकडून आग विझविण्यासाठी अडचणी आल्या. पण, अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग ७ वाजता पूर्णपणे आटोक्यात आली. दरम्यान या घटनास्थळी आ. देवयानी फरांदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तहसिलदार अनिल दौंड उपस्थितीत होते.
सायंकाळी ५ वाजता संत कबीर नगर झोपडपट्टीत विद्युत पोलवरुन झालेल्या शॉर्टसर्किटमुळे उडालेल्या ठिणग्या एका घरावरील लाकडांवर पडल्याने ही आग लागल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. या आगीमुळे आकाशात आगीचे व धुराचे लोट उडाल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, अग्निशमन दलाचे १३ बंब व ४५ पेक्षा जास्त जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करुन दिड तासात ही आग आटोक्यात आणली.
द्वारका चौकातील कावेरी हॉटेलच्या बाजूस संत कबीर नगर झोपडपट्टी ही आग लागली. या ठिकाणी २०० ते २५० घरे आहे. येथे ही आग पसरत गेल्याने काही घरातील चार सिलेंडरच्या स्फोट झाला. या आगीमुळे आकाशात २०० फूट उंचापर्यंत धूराचे लोट उसळल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, शिंगाडा तलाव येथील महापालिकेच्या मुख्य अग्निशमन केंद्राला मेजर कॉल कळताच मुख्यालयासह अन्य सहा अग्निशमन केद्रांतून तत्काळ १३ बंब व ४५ पेक्षा जास्त अग्निशमन जवान दाखल त्यांनी तत्काळ मेगा व लिटिल ब्राऊजर तसेच अन्य सामग्रीच्या साहाय्याने पाण्याचा मारा करुन आग विझविण्यात यश मिळविले.