विशेष प्रतिनिधी, मुंबई
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातील प्राइम क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये बुधवारी पहाटे अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून २० रुग्ण सुखरुप बचावले. आगीनंतर आयसीयूमध्ये दाखल झालेल्या ६ रूग्णांना दुसर्या रूग्णालयात हलविण्यात आले होते.
याबाबतच्या घटनेची माहिती अशी की, बुधवारी पहाटे ३.४० वाजेच्या सुमारास ठाण्यातील मुंब्रा परिसरातील प्राइम क्रिटीकेअर रुग्णालयात भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण ठेवले. ठाणे महानगरपालिकेने या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री मदत निधीने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
ठाणे महानगर पालिकेच्या वतीने असे सांगण्यात आले की, रुग्णांना दुसर्या रूग्णालयात हलविले जात असताना ४ रुग्णांचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासणीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली होती, मात्र यामागचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण कळू शकेल. सुरुवातीला रुग्णालयात आत १२ रुग्ण आहेत असे कळाले. परंतु येथे आल्यानंतर अधिक रुग्ण आढळले. चौकशी सुरूच आहे आणि जर कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच पालघर जिल्ह्यातील विरार येथील रुग्णालयात लागलेल्या आगीत १५ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी रविवारी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी (सीएओ) यांना निष्काळजीपणा आणि अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली.
https://twitter.com/ANI/status/1387218675573264385?s=03