विशेष प्रतिनिधी, सांगली :
उन्हाळ्यात तापमान वाढल्याने अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडतात, इतकेच नव्हे तर हिवाळ्यात आणि पावसाळ्यात देखील मोठमोठे कारखाने आणि छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये आग लागून दुर्घटना होते. परंतु सांगली जिल्ह्यातील एका गावात चक्क पवनचक्कीलाच भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. जत तालुक्यातील खोजनवाडी येथे खासगी कंपनीच्या पवनचक्कीला आग लागल्याची घटना घडली. नादुरूस्त स्थितीमधील पवनचक्कीलाच अचानक आग लागल्याची घटना घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पवनचक्कीत झालेल्या शॉर्ट सर्किटने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे. या आगीमुळे कंपनीचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
खोजनवाडी भागात गमेशा कंपनीच्या अनेक पवनचक्क्या आहेत. यातील काही पवनचक्क्या गेल्या दिवसापासून बंद आहेत. बिघाड झालेल्या पवनचक्कीला दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक कर्मचारी भरदुपारी आले होते. परंतु अचानक पवनचक्कीच्या मुख्य यंत्रामधून धुराचे लोट दिसू लागले. प्रसंगावधान राखून कर्मचारी दूर पळाले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.परंतु उंचावरील वाऱ्याच्या झोतामुळे पवनचक्कीला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. यावेळी धुराचे लोट वाऱ्याच्या वेगासोबत दूरवर पसरले होते. याबाबत कंपनीच्या वतीने जत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून या ठिकाणी असलेल्या नादुरुस्त पवनचक्क्या हटविण्यात याव्यात, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. कारण त्यामुळे आमच्या शेतीचे नुकसान होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.