नाशिक – माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या नावाने जळगाव येथील सूरज झंवर या व्यक्तीला फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक नंदन बगाडे यांच्या तक्रारीवरुन अंबड पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वीही भुजबळ फार्मवरुन बोलत असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. आता पुन्हा एकदा असा प्रकार घडल्याने ही बाब भुजबळ कुटुंबियांसाठी डोकेदुखीची ठरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र पवार यांनी तक्रार अर्ज दिला. त्यात सांगितले की, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या बंगल्यावरुन सुरज सुनिल झंवर (वय २९ रा. सुहास कॉलनी, जय नगर, जळगाव) यांना फोन आला. भुजबळ साहेबांच्या नावाने हे फोन येत होते. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याचे सांगितले जात होते. सूरज झंवर यांचे वडील येरवडा कारागृहात असून, त्यांना ९५४२३८०९१४, ९५४२२७६०३८, ८८८६२८७६०८ या मोबाईल क्रमांकावरुन फोन आले. मी पंकज भुजबळ, नाशिक येथून बोलत असल्याचे सांगण्यात आले. तुम्ही मला ८ सप्टेंबरला दुपारी साडे बारा वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात भेटा असे फोन द्वारे सांगितले.
माजी आमदार पंकज भुजबळ नावाने बोलत असलेल्या अज्ञात व्यक्तीने झंवर यांना बजावले की, तुम्ही कोणालाही, काहीही सांगणार नाही असे वचन दया. तसेच, माझे तुम्ही एक काम करून द्या, मी तुमचे एक काम करून देतो, असेही सांगितले. ही बाब फसवणुकीची असल्याचे झंवर यांना कळून चुकले. याप्रकरणी सुरज झंवर यांनी ५ ऑडिओ क्लिप दिल्या. त्यात पंकज भुजबळ व जळगाव जिल्ह्याधिकाऱ्यांचा नावाचा वापर करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक बगाडे यांच्या तक्रारीवरुन अंबड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.