लखनौ (उत्तर प्रदेश) – कोरोना प्रतिबंधक लस कोविशील्ड उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्याह जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर), ड्रग कंट्रोलर, आरोग्य सचिव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारचा गुन्हा प्रथमच दाखल झाला आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. याचे नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. मानवाधिकार कार्यकर्ते प्रताप चंद्र यांनी कोविशील्ड ही कोरोना प्रतिबंधक लस घेतली. मात्र, त्यांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या नाहीत. तर शरीरातील प्लेटलेटस कमी झाल्या. याची गंभीर दखल चंद्र यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली. मात्र, काहीही झाले नाही. त्यानंतर त्यांनी पोलिस महासंचालकांसह वरिष्ठांना विनंती केली. त्यानंतरही काहीच झाले नाही. अखेर त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. चंद्र यांच्या याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, पुनावाला यांच्यासह आरोग्य सचिव, आयसीएमआरचे अधिकारी, ड्रग कंट्रोलर, डब्ल्यूएचओ आदींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविशील्ड लसीद्वारे एकप्रकारे फसवणूक झाल्याची चंद्र यांचे म्हणणे आहे.