नाशिक– जलकुंभ भूमिपूजन कार्यक्रमात गर्दी जमविल्याप्रकरणी भाजपाच्या नगरसेविका पुष्पा आव्हाड यांच्यासह ४० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून मनाई आदेशाचे उलंघन, आपत्ती व्यवस्थापन आणि भारतीय साथरोग अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नगरसेविका पुष्पा आव्हाड,साहेबराव आव्हाड, धनंजय पोरजे, समाधान अहिरे, संजय कस्तुरे, दिलीप जायभावे, विष्णू शेलार,बाळासाहेब नागरे,रमेश जगताप आदींसह ३० ते ४० जणांविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक धामचंद्र जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे. चेतनानगर येथील पाण्याच्या टाकीजवळ नव्याने जलकुंभ बांधकाम सुरू होणार आहे. या जलकुंभाचे गेल्या रविवारी (दि.१५) भूमिपूजन झाले. या कार्यक्रमात नगरसेविका आव्हाड यांनी गर्दी जमविल्याचा आरोप आहे. कुठलीही परवानगी न घेता या सोहळयाचे आयोजन करण्यात आल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास हवालदार भोजणे करीत आहेत.