नाशिक – शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न केल्याने तसेच शासनाकडे बिल सादर न केल्याने गंगापूर रोडवरील विद्या विकास मेडिसिटी रुग्णालयाच्या डॉक्टरविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाने या रुग्णालयाची कोविड मान्यता रद्द केली आहे. डॉ. मनोज कदम असे डॉक्टरांचे नाव आहे.
रुग्णांना अवाजवी बिल आकारणे, शासकीय आदेशांचे पालन न करणे, सुविधा न पुरवणे, रुग्ण व नातलगांच्या तक्रारी, बिलाची माहिती प्रशासनान न दिल्याचा ठपका रुग्णालयीन प्रशासनावर होता. त्यामुळे प्रशासनाने या रुग्णालयाची कोविड मान्यता रद्द केली आहे. तसेच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मनपाच्या वतीने गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना काळात रुग्णालयांना कोविड रुग्णालयाची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार रुग्णालयांनी ८० टक्के रुग्णांवर शासकीय दराने तर २० टक्के रुग्णांवर रुग्णालयाच्या दराने उपचार करण्यास सांगितले होते. त्यानुसार प्रशासनाने पाहणी करण्यासाठी रुग्णालयांकडे अहवाल मागवला होता. मात्र विद्या विकास मेडिसीटी रुग्णालयाने अहवाल सादर केला नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.