भाजप अध्यक्षासह हॉटेल मालकावर गुन्हा
नाशिक : मनाई आदेशाचे उलंघन करीत, गर्दी जमवून हॉटेलमध्ये पक्ष कार्यकारणीची बैठक घेतल्याप्रकरणी भाजपाचे अध्यक्ष गिरीष पालवे यांच्यासह हॉटेल रॉयल हेरिटेजचे मालक अनिरूद्द शहा यांच्याविरूध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भद्रकालीचे हवालदार एल.एस.केदारे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने गंजमाळ सिग्नल भागातील हॉटेल रॉयल हेरीटेज येथे गुरूवारी (दि.२९) विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोवीड – १९ च्या पार्श्वभूमिवर शहरात मनाई आदेश जारी असतांना या बैठकीस उत्तर महाराष्ट्रातील कार्यकारणी सदस्यांना आमंत्रीत करण्यात आले होते. मनाई आदेश लागू असल्याची माहिती असतांना संबधीतांनी जाणीव पुर्वक १५० ते २०० महिला व पुरूष पदाधिका-यांची गर्दी जमवून बैठक घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
परप्रांतीय बेरोजगाराचा मोबाईल पळविला
नाशिक : कामाच्या शोधार्थ फिरणा-या परप्रांतीय तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील गणेशनगर भागात घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश रामपरसन यादव (२७ मुळ रा. बिहार हल्ली सोमेश्वर कॉलनी) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. यादव काही दिवसांपूर्वीच नातेवाईकांकडे कामधंदा शोधण्यासाठी आला आहे. गुरूवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास तो औद्योगीक वसाहतीत गेला असता ही घटना घडली. कामाचा कारखान्यांमध्ये शोध घेवून तो गणेशनगर येथील शान कारच्या शोरूम समोरून मोबाईलवर बोलत पायी जात असतांना एमएच १५ एफएक्स ७६६६ या दुचाकीवर ट्रिपलसिट आलेल्या भामट्यांपैकी एकाने त्याच्या हातातील आठ हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेत पोबारा केला. अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत.