नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बालविवाह प्रकरणात लॉन्स मालक, बालकांचे पालक आणि भटजी यांच्यावर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.नाशिक रोड परिसरात येथे २३ मे रोजी उपनगर येथील श्रीहरी लॉन्स मध्ये हा विवाह झाला होता. त्यात बोरगड येथे राहणाऱ्या १९ वर्षे १ महिना २७ दिवसांचे युवकाचा उपनगर हद्दीत राहणाऱ्या १६ वर्षे ११ महिने १२ दिवसांच्या मुलीशी विवाह केला. दोघांचेही विवाहासाठीचे वय पूर्ण नाही अशी माहिती असतानाही दोन्हीं कुटुंबीयांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्याला झुगारुन विवाह लावण्यात आला. या बालविवाहाची माहिती जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाच्या चाइल्ड हेल्पलाइनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर मिळाली. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड हेल्पलाइन व बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी नाशिक यांनी याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्याकडे तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर बालविवाह झाल्याचे उघड झाले.
बाल कल्याण समिती नाशिक यांच्या सुचनेनुसार पोलिसांनी नागेश पवार, लक्ष्मी पवार (दोघे राहणार बोरगड) मीनाक्षी शिंदे, पंडित शिंदे (दोघे राहणार नाशिक रोड) यांच्यासह श्रीहरी लॉन्सचे संचालक व विवाह लावणारे भटजी यांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ चे कलम ९, १० आणि ११ नुसार म्हसरूळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व सदरचा गुन्हा उपनगर पोलिसाकडे वर्ग करण्यात आला आहे.
लॉन्स मालक, मंडपवाले, भटजी, बँड पथक केटरिंग यांनी देखील विवाहाची बुकिंग घेण्यापूर्वी वधू-वरांचे वयाची खात्री करूनच बुकिंग करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.