नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– खोट्या गुन्हयात अडकवून पून्हा जेलमध्ये टाकू अशी धमकी देत दांम्पत्यासह त्यांच्या मुलाने एका व्यावसायीकाकडे पाच लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर कुटूंबियाने व्यावसायीक बंधूवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पुन्हा खंडणीसाठी तगादा सुरू केल्याने व्यापा-याने पोलीस आयुक्तांची भेट घेत आपबिती कथन केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दिलीप जाधव व कमल जाधव, मनोज जाधव (रा.दिपनगरजवळ,शिवाजीनगर नाशिक पुणा रोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत श्याम सुभाष पाटकर (रा.सहकार कॉलनी,शिवाजीनगर ) यांनी फिर्याद दिली आहे. पाटकर यांचे दुकान संशयित जाधव कुटुंबिय वास्तव्यास असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर आहे. दुकानाचा फलक लावण्याच्या वादातून १६ जानेवारी रोजी संशयित जाधव कु
टुंबिय व त्यांच्या नातेवाईकांनी दुकानात शिरून नासधुस करीत पाटकर बंधूना मारहाण केली होती. त्यानंतर जाधव यांच्या पत्नीने उपनगर पोलीस ठाणे गाठल्याने पाटकर कुटूंबियांविरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेनंतर १५ दिवसांनी पुन्हा जाधव दांम्पत्य दुकानात आले व तुम्हाला धंदा करायचा असेल तर आम्हाला ५ लाख रुपये द्या, नाहीतर खोटे गुन्हे दाखल करून जेलवा-या घडवू, तसेच जीवे मारण्याची धमकी देत संशयितांनी पैशांची मागणी केली. आधीच पहिल्या गुन्ह्यात चौकशी सुरू असताना पुन्हा जाधव कुटुंबियाने त्रास देणे सुरू केल्याने पाटकर बंधूनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली असता हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.