नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दहशत निर्माण करण्यासाठी गणेश मंडळ पदाधिका-यास मारहाण करीत टोळक्याने धुडघूस घातल्याची घटना गजानन पेट्रोलपंप भागात घडली. या घटनेत पदाधिका-यावर कोयत्या सारख्या धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने तो जखमी झाला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कुणाल एखंडे, अभिमन सानप, करण कर्पे, महेश कर्पे, सिध्देश पिंगळे,शुभम मोहिते व त्यांचे साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत प्रविण रावसाहेब शिंदे (३८ रा.पगभाग्य निवास,श्री गजानन पेट्रोलपंपाच्या मागे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. म्हसरूळ परिसरातील गजानन पेट्रोलपंपाजवळील देवभूमि अपार्टमेंट भागात गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या मंडळाचे शिंदे पदाधिकारी असून रविवारी (दि.८) रात्री या ठिकाणी गाण्यांचा कार्यक्रम सुरू असतांना ही घटना घडली. परिचीत असलेल्या संशयितांच्या टोळक्याने या ठिकाणी येवून धुडघूस घालता.
यावेळी शिंदे यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता टोळक्याने त्यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी टोळक्यातील कुणाल एखंडे व अभिमन सानप यांनी त्यांच्यावर कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करीत जखमी केले. यावेळी टोळक्याने मंडळाच्या अन्य सदस्यांना शिवीगाळ व दमटाची करीत दहशत माजविली. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अधिक तपास उपनिरीक्षक क्षिरसागर करीत आहेत.