जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दोन महिलांसह वृद्धाच्या अपघाती मृत्यूप्रकरणी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या दोन्ही ठेकेदारांविरुद्ध (झांडू व ॲग्रो इन्फ्रा) गुन्हा दाखल करण्याचा निर्णय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच शहराबाहेरुन जाणाऱ्या रस्त्याचे चौपदरीकरण मार्च २०२५ पूर्ण करण्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र संबंधित ठेकेदाराकडून घेण्याचा यावेळी निर्णय झाला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सा.बां.विभागाचे नवनाथ सोनवणे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
यावेळी आमदार भोळेंनी वृद्धाच्या मृत्यूनंतर आंदोलन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यावर आक्षेप घेतला. प्रकल्प संचालक पवार यांची भूमिका चुकीची असल्याचे सांगत त्यांनी ठेकेदारांविरोधात सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली.
ठेकेदारा विषयी तीव्र नाराजी
दरम्यान, पालकमंत्र्यांनी ठेकेदाराला ‘बायपास’च्या कामाविषयी विचारणा केली. तेव्हा मार्च २०२५ पर्यंत काम पूर्ण होईल, असे या ठेकेदाराने सांगितले. ‘यावेळी पालकमंत्र्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. ठेकेदाराने पहिल्यांदाच चेहरा दाखविल्याविषयी जाब विचारून ‘ त्यांच्या कामाविषयी असंतोष व्यक्त केला. काम लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश दिले. मूळ ठेकेदारांपैकी एक जण या बैठकीला उपस्थित होता. ‘बायपास’चे काम तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी कल्याण येथील ठेकेदाराला सोबत घेतल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तर शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काम दोन ठेकेदारांकडे विभागाले गेल्याचे यावेळी सांगितले. यावेळी समितीने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.