नाशिक – जेलरोड येथे फ्लॅट विक्री करायची असे सांगून एका दाम्पत्याने महिलेला २०१८ साली साडेपाच लाख रुपयांचा गंडा घातला. या महिलेने न्यायालयात दाद मागितल्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत समजलेली माहिती अशी की, फिर्यादी सुरेखा अनिल आहिरे (रा. ह. मु. लक्ष्मी अपार्टमेंट, लोखंडे मळा, नाशिकरोड) यांना आरोपी संजय बाजीराव पगारे, शुभांगी बाजीराव पगारे (दोघे रा. वैष्णवी अपार्टमेंट, चंपानगरी, नाशिकरोड) व रणजित अरुण पगारे (रा. कैलासजी सोसायटी, जेलरोड) यांनी मौजे दसक गाव शिवारात फ्लॅट क्रमांक ५ विक्री करावयाचा आहे, असे आहिरे यांना सांगितले. त्यानंतर या तिघांनी रोख स्वरूपात, तसेच धनादेशाद्वारे ५ लाख ४२ हजार रुपये घेतले. पण, हे पैसे देऊनही फ्लॅटची खरेदी न देता दमदाटी व शिवीगाळ केली. त्याचप्रमाणे रणजित पगारे यांच्या फ्लॅट नंबर ८ मध्ये ठेवलेले फर्निचर, दागिने, घरगुती सामान, कागदपत्रे आदी साहित्याचा अपहार करून स्वत:कडे ठेवून सुरेखा आहिरे यांची फसवणूक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बटुळे करीत आहेत.