नाशिक – मुंबई नाका परिसरातील एका हॉस्पिटलमधून तपासणी दरम्यान सोनोग्राफी मशीन गायब केल्याचे समोर आल्यानंतर मनपा आरोग्य विभागाने मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीबाबत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी माहिती दिली आहे. महानगरपालिका आरोग्य विभागाकडून शहरातील सोनोग्राफी सेंटर, गर्भपात केंद्र तपासणी मोहिम गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. त्यात या हॅास्टिलमध्ये सोनोग्राफी मशीन गायब झाल्याचे समोर आले आहे.
मुंबई नाका परिसरातील या हॉस्पिटलमध्ये लागणारे बेस कॅम्प सोनोग्राफी मशीन हे नोंदणीकृत मशीन प्रतिनिधींच्या नावे होते. दोन-तीन वेळा आरोग्य वैद्यकीय पथक त्या ठिकाणी पाहणीसाठी गेले. मात्र, सदर ठिकाणी सोनोग्राफी मशीन आढळून आले नाही. या हॉस्पिटलकडून सोनोग्राफी मशीन स्थलांतर किंवा हलवण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सदर सोनोग्राफी मशिनचा ठावठिकाणा न लागल्याने आरोग्य विभागाने मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.