नाशिक- कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी माजी मंत्री मधुकर पिचड, त्यांची पत्नी कमलाबाई, मुलगी अश्विनी व इतरांविरोधांत न्यायालयाच्या आदेशाने पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिचड यांची सुन राजश्री किरण देशमुख यांनी कोर्टात फिर्याद दिली होती. गेले वर्षभर चाललेल्या या खटल्याची सुनावणी नुकतीच पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने आदेश दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी राजश्री देशमुख या पिचड यांच्या सुन असून त्यांनी आपल्या पतीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा गंभीर आरोपही केला आहे. या आत्महत्येनंतर आपल्याला मानसिक व शारीरीक छळ करून घराबाहेर काढून देण्यात आले. घर सोडल्यानंतरही राजकीय दबावातून आपला छळ झाल्याचे राजश्री यांनी तक्रारीत नमूद केले आहे. पिचडांकडून त्रास सुरूच राहिल्याने आपण नाशिकला परतून सुरूवातीस पोलिस आयुक्तांकडे आणि नंतर कोर्टात तक्रार दिल्याचे देशमुख यांनी सांगितले. या त्रासाची तक्रार मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांकडे सुध्दा केली असून संरक्षण मिळण्याबाबत अर्ज केल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयात देशमुख यांच्यातर्फे अॅड. उमेश वालझडे यांनी बाजू मांडली. या प्रकरणी कोर्टाच्या आदेशाने ३० नोव्हेंबर रोजी पंचवटी पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार कायद्यासह, धमकावणे, मारहाण, शिवीगाळ, कट करणे आदी कलमांनुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.