नाशिक : भावजयीने खरेदी केलेली जमिन दिरांनी हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट कागदपत्राच्या आधारे वडिलोपार्जीत जमिन असल्याचे भासवून तोतया भाऊ भावजयी उभे करून या कोट्यावधींच्या जमिनीचे परस्पर तत्कालीन तहसिलदारांसमोर वाटपपत्र केल्याने हा प्रकार समोर आला असून, पोलीसांचे उबंरठे झिजवूनही न्याय न मिळाल्याने महिलेने न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशान्वये पतीच्या चार सख्या भावांसह दोघा तोतयांविरूध्द येवला शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाऊसाहेब मढवई,शंकर मढवई,शांताराम मढवई व रविंद्र मढवई व अन्य एक महिला आणि पुरूष (रा.सर्व पिंपळगाव लेप ता.येवला) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भावांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार याप्रकरणी स्मिता बाळासाहेब मढवई (रा.साठेबाग,एमजी रोड नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे. मौजे जळगाव नेऊर येथील जगन्नाथ मुंदडा यांच्या मालकीची गट क्रमांक २७ मधील क्षेत्र ३ हेक्टर ८१ आर आणि शेत गट क्रमांक २८ क्षेत्र ६ हेक्टर ४२ आर शेतजमिन स्मिता मढवई यांनी सन.२००८ मध्ये खरेदी केलेली आहे. या जमिनीच्या खरेदीपोटी मुंदडा यांना ५० लाख रूपये धनादेश आणि डिमांड ड्रॉफच्या माध्यमातून अदा करण्यात आले. मात्र व्यवसायानिमित्त स्मिता मढवई व त्यांचे कुटूंब नाशिक शहरात वास्तव्यास असल्याने दिरांनी ही फसवणुक केली. पडित जमिन हडप करण्यासाठी संशयीतांनी तत्कालीन येवला तहसिलदारांची दिशाभूल करून बेकायदेशीर वाटपपत्र तयार केले. वडिलोपार्जीत जमिन असल्याचे भासवून या वाटपपत्रासाठी संशयीतांनी बनावट दस्तऐवज तयार करून तसेच अनोळखी महिला व पुरूषास तहसिलदारांसमोर उभे करून चार भावांमध्ये परस्पर जमिनीचे वाटप करून सदर मिळकतीर त्यांची नावे लावून घेतली. हा प्रकार सन.२००९ मध्ये घडला असला तरी संशयीतांनी चुक मान्य करून मिळकत पुन्हा नावावर करून देतो अशी तोंडी ग्वाही दिल्याने दुर्लक्ष करण्यात आले. कालांतराने जमिन नावावर करून द्यावी असा तक्रारदार महिलेने तगादा लावला असता संशयीतांनी तिला मारहाण केली. त्यामुळे महिलेने पोलीसांपाठपुरावा केला मात्र तिला न्याय न मिळाल्याने तीने न्यायालयात धाव घेतली होती. महिलेने जमिन खरेदीचे कागदपत्र आणि दस्तऐवजातील साक्ष-या खोट्या असल्याचे अक्षरतज्ञांचा अहवाल आदींसह विविध पुरावे न्यायालयात सादर केल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. येवला शहर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत. दरम्यान या घटनेतील तोतया भाऊ आणि भावजयी शोध होणे कामी संशयीतांना तात्काळ अटक करावी अशी मागणी स्मिता मढवई यांनी केली आहे.