पत्नीसमक्ष पतीवर धारदार शस्त्राने हल्ला; आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक – पत्ता विचारण्याचा बहाणा करून एकाने पत्नीसमक्ष पतीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना औरंगाबाद रोडवरील निलगिरी बाग परिसरात घडली. या घटनेत ३७ वर्षीय व्यक्ती जखमी झाला असून संशयीताने पोलीसात गेल्यास कुटूंब संपवून टाकण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आक्या (पूर्ण नाव पत्ता नाही) असे संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी जखमी रामेश्वर सिताराम वैष्णव (३७,रा. निलगिरी बाग) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार बुधवारी (दि.८) वैष्णव दांम्पत्य आपल्या घरात असतांना आक्या तेथे आला. यावेळी शिवीगाळ करीत त्याने रामेश्वर वैष्णव यांच्या पत्नीकडे रम्या कुठे आहे अशी विचारणा केली. शिवागीळ करण्याचा आवाज आल्याने रामेश्वर घराबाहेर आले असता संशयीताने संत्या कुठे राहतो अशी विचारणा करून हा हल्ला केला. वैष्णव यांनी संत्या याचा पत्ता माहित नसल्याचे सांगताच संतप्त संशयीताने धारदार शस्त्राने रामेश्वर यांच्या मानेवर वार करत जखमी केले. यावेळी त्याने पोलीसात गेलास तर घरदार संपवून टाकेन अशी धमकी देत पोबारा केला. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.
दोघा अल्पवयीन मुलानी एकाला केली बेदम मारहाण
नाशिक – काय करता असे विचारल्याचा राग आल्याने दोघा अल्पवयीन मुलानी एकाला बेदम मारहाण केल्याची घटना आनंदवल्ली नजीकच्या पाईपलाईन रोडवरील एका बांधकाम साईटवर घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार कोंडीराम थोरात (रा. आकार सेलिस्टिया, काळेनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गुरुवारी (दि.९) रात्री ही घटना घडली. संत कबीर नगर भागातील दोन अल्पवयीन मुले काळेनगर येथील आकार सेलिस्टिया बांधकाम साईटवर बसले होते. थोरात यांनी त्यांना येथे काय करता असे विचारणा केली असता ही घटना घडली. संतप्त दोघा विधी संर्घषित बालकांनी थोरात यांना शिवीगाळ करीत जवळ पडलेल्या लाकडी दाडक्याने व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत थोरात यांच्या डोळ््याजवळ दुखापत झाली असून अधिक तपास पोलीस नाईक झिरवाळ करीत आहेत. संशयीतांची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे.