मनसेलाही बैठक घेणे पडले महाग; शहराध्यक्षांविरूद्द गुन्हा दाखल
नाशिक : शहरात जमावबंदी आदेश लागू असतांना बैठक घेतल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षांविरूद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्दी जमविल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मनसेचे शहराध्यक्ष अंकुश अरुण पवार यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई संजय सपकाळे यांनी तक्रार दाखल केली आहे. कामटवाडा येथील माऊली लॉन्स येथे शुक्रवारी (दि.२७) मनसेची विभागीय बैठक पार पडली. शहराध्यक्ष पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संघटनात्मक बैठकीत कार्यकर्त्यांची गर्दी जमविल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक उत्तम सोनवणे करीत आहेत.
घरात चक्कर येवून पडल्याने ५० वर्षीय इसमाचा मृत्यु
नाशिक : घरात चक्कर येवून पडल्याने ५० वर्षीय इसमाचा मृत्यु झाला. ही घटना सिडकोतील राणा प्रताप चौक भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. धनंजय भालचंद्र मोरे (रा.महाले फार्म जवळ,लक्ष्मीनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रविवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास मोरे अचानक आपल्या घरात चक्कर येवून पडले होते. याप्रसंगी त्यांच्या नाका तोंडातून रक्तश्राव झाल्याने कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपस पोलीस नाईक परदेशी करीत आहेत.