नाशिक – केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे नाशिकमध्ये ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. पण, या यात्रेविरोधात आता नाशिक पोलिसांनी पहिला गुन्हा अंबड पोलिस स्टेशनमध्ये दाखल केला आहे. शहरात संचारबंदी लागू असतांना गर्दी जमवल्याप्रकरणी हा गुन्हा भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. ही यात्रा वेगवेगळ्या पोलिस हद्दीतून गेल्यामुळे हा गुन्हा ४ पोलिस स्टेशमध्ये दाखल करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. त्यात अंबड, भद्रकाली, पंचवटी आणि सरकार वाडा या पोलिस स्टेशनचा समावेश असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.. साथ रोग कायद्यानुसार १८८ प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात राजकीय पक्षांनी घेतलेल्या विविध कार्यक्रमात असे गुन्हे सर्वत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण, नाशिकच्या गुन्ह्यामध्ये केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री असलेल्या डॅा. पवार यांच्या यात्रेविरोधात साथ रोग कायद्यानुसार कारवाई होणे ही गोष्ट गंभीर आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्याची देशाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे. त्यांच्याच यात्रेने कोरोनाचे नियम तोडल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम व अटीचे पालण इतर जण कसे पाळेल हाच खरा प्रश्न आहे…