पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘फिनस्विमिंग’ खेळाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, अधिकाधिक खेळाडूंनी हा खेळ खेळला पाहिजे, यासाठी आगामी काळात पुणे येथे आयोजित होणाऱ्या स्पर्धेला सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
अंडरवॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने शिवछत्रपती क्रीडासंकुल म्हाळुंगे- बालेवाडी येथे ९ ते ११ डिसेंबर २०२२ या कालावधीत आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय फिनस्विमिंग स्पर्धेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. फेडरेशनचे सचिव आणि द्रोणाचार्य पुरस्कार आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. तपन कुमार पाणिग्रही,रोलबॉल राज्य संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, रीअर अॅडमिरल पी.डी शर्मा, साईश्री रुग्णालयाचे संचालक डॉ. नीरज आडकर, राष्ट्रीय लाईफ सेव्हिंगचे कौस्तुभ बक्षी आदी उपस्थित होते.
फिनस्विमिंग नवा खेळ असल्याचे नमूद करून उत्सुकतेने या खेळाचा आनंद घेतल्याचे पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले भौतिक प्रगतीसोबत खेळाच्या प्रगतीला केंद्र आणि राज्यस्तरावर प्रोत्साहन देण्यात येत आहे. राज्यात खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी शासकीय खात्यात नोकरी तसेच खेळाबरोबर अभ्यासातही प्रगती करणाऱ्या इयत्ता १० व १२ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या खेळाडूंला २५ क्रीडा गुण देण्यात येते. राज्यात खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना सुवर्ण, कांस्य व रौप्य पदक प्रदान करण्यात आले. यावेळी खेळाडूंनी ५० मीटर फेन्स, ४ बाय २०० मीटर रिले बाय फेन्स या प्रकारातील प्रत्याक्षिकाचे सादरीकरण केले.