विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन यांनी सरकारी पैश्यांतून कुटुंबासोबत चहा–नाश्ता केल्याचे प्रकरण गेल्या आठवड्यात जगभर गाजले. पंतप्रधानांना असे करता येत नाही, याचे सर्वाधिक आश्चर्य भारतात व्यक्त करण्यात आले. पण आता त्याहीपेक्षा मोठी आश्चर्याची बाब पुढे आली आहे. ती म्हणजे ज्या चहा–नाश्त्यासाठी फिनलँडच्या पंतप्रधानांना लक्ष्य करण्यात आले त्याची किंमत तब्बल साडेबारा लाख रुपये होती.
भारतीय रुपये आणि इतर देशांमध्ये चलनांमध्ये मोठी तफावत आहे, हे वास्तव आहे. पण खर्चाचाच विचार केला तरी १२ लाख ४० हजार रुपयांचा चहा–नाश्ता म्हणजे कमालच झाली. या बाबतीत त्यांच्यावर फिनलँडमधील विरोधी पक्षाने जोरदार हल्ला चढविल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून कारवाईचे संकेत दिले होते. त्यामुळे आता सना मरीन यांनी बॅकफूटवर येत वाद नको म्हणून १२ लाख ४० हजार रुपये सरकारला परत करण्याची घोषणा केली आहे. याचाच अर्थ अशा प्रकारचा कुठला भत्ता पंतप्रधानांसाठी राखीव असतो, हा सना मरीन यांचा दावाही खोटा होता.
कायदा झाला तरी
गेल्या दीड वर्षांपासून पंतप्रधान असलेल्या ३५ वर्षीय सना मरीन यांनी म्हटले आहे की, ‘आता यासंदर्भात मी कुठलेही दावे करणार नाही. भविष्यात अशा प्रकारचा भत्ता सुरू झाला तरीही मी घेणार नाही. स्वतः आपल्या खाण्या–पिण्याचा खर्च करेन.’
आरोपांची मालिका सुरू झाल्यावर मरीन यांनी अधिकाऱ्यांनाही सत्यता पडताळून बघण्याचे आदेश दिले होते, हे विशेष. पंतप्रधानांच्या भूमिकेतून ही मागणी केली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. या प्रकरणाचा तपास फिनलँड पोलीस आणि अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या बंगल्यावर दर आठवड्याला १ हजार ३३ डॉलर एवढा खर्च चहा, नाश्ता व भोजनावर केला जात होता.
विरोधी पक्षाला मिळाला मुद्दा
फिनलँडमध्ये लवकरच विभागीय निवडणुका आहेत. त्यामुळे सना मरीन यांच्या विरोधात विरोधी पक्षाला एक मुद्दा मिळाला आहे. मरीन यांचा पक्ष १३ जूनला होणाऱ्या निवडणुकीत फारसा प्रभाव पाडू शकणार नाही, असा अंदाज व्यक्त होत आहे.