नवी दिल्ली : भारतीय उपखंडात मोसमी हवामान असल्याने चार महिने पाऊस पडतो, त्यापूर्वी साधारणतः मे महिन्यात चक्रीवादळे होतात. अलीकडच्या काळात अरबी समुद्रात चक्रीवादळे होण्याचे प्रमाण वाढले आहे . भारतात दरवर्षी येणाऱ्या चक्रीवादळाला वेगवेगळी नावे देण्यात येतात यंदा आलेले ‘तोक्ते ‘ हे चक्रीवादळ नेमके काय आहे ते जाणून घेऊ या…
बंगालच्या उपसागराप्रमाणेच गेल्या काही वर्षापासून अरबी समुद्रातही येणाऱ्या चक्रीवादळांची संख्या वाढली आहे. यासाठी समुद्र पृष्ठ तापमान, वाऱ्यांचा वेग, दिशा आणि आर्द्रतेचे प्रमाण कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे ओखी, क्याप, महा, निसर्ग आणि आता तोक्ते ही चक्रीवादळे त्याचेच परिणाम आहेत. अरबी समुद्राच्या काही भागातील तापमान हे अधिक प्रमाणात उष्ण होत आहे, याचेही परिणाम चक्रीवादळांच्या निर्मितीच्या रुपात दिसून येत आहेत. तरीही अरबी समुद्राच्या भागात अशी वादळे येणे ही मात्र लक्ष वेधणारी बाब आहे. सध्या किनाऱ्यावर धडकण्यासाठी घोंगावत प्रवास करणाऱ्या चक्रीवादळाला हवामान विभागानं ‘तोक्ते ‘ असं नाव दिले असून या शब्दाचा अर्थ होतो पाल, किंवा पालसदृश प्राणी. बर्मिज भाषेतील हे नाव असून, या वादळामुळे जोरदार पर्जन्यवृष्टी आणि सोसाट्याचे वारे पश्चिम भारतातील पट्ट्यात वाहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. ‘तोक्ते चा उच्चार काही जण टॉक्टे असाही करतात.
सदर चक्रीवादळाचा प्रवास पाहता केरळ, गोवा, कोकण किनारा मार्गे १७ मे रोजी मध्यरात्री किंवा १८ मे रोजी सकाळच्या सुमारास हे वादळ कधीही गुजरातकिनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील काही भागात हे वादळ अधिक तीव्र दिसेल. दक्षिणपूर्व आणि मध्य अरबी समुद्री पट्टा आणि त्याजवळच्या भागात तोक्तेची तीव्रता अधिक दिसणार आहे. पण, थंड पाणी आणि कोरडी हवा पाहता अरबी समुद्रातील उत्तर भागात या वादळाची तीव्रता कमी होऊ शकते. परंतु आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या तुलनेत गुजरात प्रांत चक्रीवादळाशी समरुप नसल्यामुळे येथे त्याचे काही गंभीर परिणाम दिसून येऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून या भागांमध्ये आवश्यकतेनुसार सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, डॉ. श्रीधर बालसुब्रमण्यम यांच्या मते, तोक्ते चक्रीवादळामुळे मोसमाचा वेग काहीसा कमी होऊन पावसाच्या आगमनास काहीसा विलंब होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवाळसदृश परिस्थितीमुळं निर्माण होणारे जोरदार वारे मान्सून अगदी तोंडावर असतानाच धडकल्यामुळे त्याच्या प्रवासात अडथळा निर्माण करु शकतात. परिणामी मान्सूनच्या आगमनास विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.