मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
एक एप्रिल २०२२ पासून अनेक मोठे बदल होणार आहेत. या बदलांमुळे तुमच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे. आर्थिक क्षेत्रातील हे बदल बँक ग्राहक, करदाते आणि वरिष्ठ नागरिक यांच्यासाठी महत्त्वाचे असतील. तर चला मग कोणकोणते बदल होणार आहेत, ते पाहूया….
अॅक्सिस बँकेचे नियम बदल
अॅक्सिस बँकेत (Axis Bank) ज्या ग्राहकांचे बचत आणि वेतनाचे खाते आहेत, त्यांच्यासाठी एक एप्रिलपासून नवे नियम लागू होणार आहेत. बँकेच्या बचत खात्यात किमान शिल्लक मर्यादा १० हजारांवरून वाढवून १२ हजार रुपये करण्यात आली आहे. महानगरांमध्ये (Metro/Urban City) बचत खात्याची मर्यादा बदलण्यात आली आहे, अशी माहिती अॅक्सिस बँकेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. मोफत पैसे काढण्याची मर्यादा बदलून ४ वेळा मोफत पैसे काढणे किंवा १.५ लाख रुपये करण्यात आली आहे.
पीएफ खात्यावर कर
एक एप्रिलपासून सीबीडीटीने प्राप्तिकर (२५ वी दुरुस्ती) नियम २०२१ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे, कर्मचारी निर्वाह निधी (ईपीएफ) खात्यात जमा असलेल्या २.५ लाख रुपयांपर्यंतचा निधी करमुक्त करण्यात येणार आहे. त्याहून अधिक रकमेचे योगदान जमा केल्यास त्याच्या व्याजावर कर लावला जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीपीएफ खात्यातील वार्षिक ५ लाख रुपयांपर्यंतचा निधी करमुक्त असेल.
एमआयएस व्याजासाठी बचत खाते
डाकघरतर्फे देण्यात येणाऱ्या मासिक आय योजना (एमआयएस), वरिष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) किंवा डाकघर टर्म डिपॉझिट (टीडी) या योजनांमधील गुंतवणुकीसंदर्भातील नियमही बदलणार आहेत. एक एप्रिलपासून या योजनांमधील व्याजाची रक्कम रोख मिळणार नाही. त्यासाठी बचत खाते उघडावे लागणार आहे. डाक विभागाच्या माहितीनुसार, अनेक ग्राहकांनी आपले डाकघर बचत खाते किंवा बँक खाते एमआयएस, एससीएसएस, टीडी या योजनांशी लिंक केले नसतील, आणि अशा प्रकरणांमध्ये व्याजाचे पेमेंट होत नसेल, तर त्यासाठी ते लिंक करणे आवश्यक आहे.
जीएसटीचे नियम सोपे
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने (सीबीआयसी) वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अंतर्गत ई-चलन (इलेक्ट्रॉनिक चलन) जारी करण्यासाठी उलाढालीची मर्यादा पूर्वीच्या ५० कोटी रुपयांच्या मर्यादेवरून घटवून २० कोटी रुपये केली आहे.