एकल कलाकार, समुह, संस्था,
फड व निर्मांत्यांना अर्थसहाय्य योजना
देशात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झाल्याने संपूर्ण राज्यासह देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतरही राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयेाजन, नाट्यगृहे, चित्रपटगृहे यांच्यावर प्रतिबंध असल्याने अनेक कलाकार दीड वर्षांपासून आपली कला सादरीकरणातून होणाऱ्या उत्पन्नातून वंचित होते. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील संघटित व असंघटित क्षेत्रातील प्रयोगात्मक कला प्रकारातील कलाकारांना शासनामार्फत आर्थिक मदत होण्यासाठी 3 नोव्हेंबर, 2021 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील प्रयोगात्मक कलेच्या प्रकारातील कलाकार, कलासमुह यांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अर्थसहाय्य देण्यासाठीचा निर्णय घेतला आहे.
या अर्थसहाय्य योजनेतंर्गत एकरकमी कोविड दिलासा पॅकेज अंतर्गत 28 कोटी रुपयांचे अनुदान 56 हजार कलाकारांना देण्यात येणार आहे. ( प्रति कलाकार 5 हजार प्रमाणे देय आहे) तर 847 समूह लोककलापथकांचे चालक, मालक, निर्मात्यांना एकरकमी कोविड विशेष अनुदान देण्यात येणार आहे. त्या लोककलेच्या तपशिलानुसार शाहिरी कलाप्रकारासाठी 100 संस्थांना 50 हजार प्रति पथकानुसार 50 लाख अनुदान, खडीगंमत कलाप्रकारासाठी 60 संस्था संख्येस 1 लाखप्रमाणे 60 लाख अनुदान, संगीत बारी कलाप्रकारासाठी 200 संस्था संख्येस 50 हजार प्रमाणे 1 कोटी, तमाशा फड कलाप्रकारासाठी पूर्णवेळ 25 संस्था संख्येस 2 लाख प्रमाणे 50 लाख, तमाशा फड हंगामी कलाप्रकारासाठी 80 संस्थांना 1 लाखप्रमाणे 80 लाख, दशावतार कलाप्रकारासाठी 40 संस्थासख्येस 1 लाख प्रमाणे 40 लाख, नाटक कलाप्रकारासाठी 35 संस्थासख्येस 2 लाख प्रमाणे 70 लाख, झाडीपट्टी कलाप्रकारासाठी 40 संस्थासख्येस 1 लाख प्रमाणे 40 लाख, विधीनाट्य कलाप्रकारासाठी 216 संस्थासख्येस 25 हजार प्रमाणे 54 लाख, सर्कस कलाप्रकारासाठी एका संस्थेस 6 लाखप्रमाणे 6 लाख तर टुरिंग टॉकीज कलाप्रकारासाठी 50 संस्थासख्येस 1 लाख प्रमाणे 50 लाख अशा 847 संस्थाना 6 कोटी रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे.
पात्रता व अटी
अर्जदार महाराष्ट्र राज्यातील प्रयोगात्मक कलेतील कलेवर गुजराण असणारा आर्थिकदृष्टया दुर्बल कलाकार असावा. त्याचे महाराष्ट्र राज्यात 15 वर्षे वास्तव्य असावे, कलेच्या क्षेत्रात 15 वर्ष कार्यरत असल्याबाबतचे पुरावे, वार्षिक उत्पन्न रुपये 48 हजारच्या कमाल मर्यादत असावे, केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वृध्द कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच इतर वैयक्तिक शासकीय अर्थसहाय्याच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय असणार नाही. उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, बॅक खाते तपशिल, शिधापत्रिका विहीत नमुन्यातील अर्जासोबत जोडावीत.
जिल्हास्तरीय समितीची रचना
लाभार्थ्यांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवून अर्जाची छाननी समितीमार्फत करण्यात येवून जिल्हाधिकारी यांच्याकडून शिफारस करण्यात आलेल्या पात्र कलाकाराची यादी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांना सादर करतील व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुज्ञेय अर्थसहाय्य वर्ग करतील.
समूह लोककलापथकांचे चालक, मालक, निर्माते ’ यांची निवड करण्यासाठी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्याकडून निवड समिती तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यास्तरावर छाननी समिती गठित करण्यात येईल. निवडीसाठी वृत्तपत्रात जाहिरात प्रसारीत करुन अर्ज मागविण्यात येईल. त्यांनतर समितीमार्फत अर्जाची छाननी करुन पात्र पथकाची अंतिम निवड समिती करेल व निवड झालेल्या संस्थांची नावे शासनाकडे शिफारस करतील. त्यानंतर शिफारस करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुज्ञेय अर्थसहाय्य वर्ग करतील.
समूह लोककलापथकाच्या (शाहिरी, खडीगंमत, दशावतार, झाडीपट्टी, संगीतबारी, तमाश, टुरिंग टॉकिज, सर्कस, विधीनाट्य) अर्थसहाय्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज, कंपनी कायदा किंवा सोसायटी कायदा, विश्वस्त कायद्यांतर्गत किंवा एमएसएमई अंतर्गत पथक नोंदणीचे प्रमाणपत्र, कलापथकात काम करणाऱ्या कलावंताची नावे व पत्ता, लोककलापथकाचे चालक, मालक, निर्माते यांचे आधार कार्ड व बँक खाते तपशिल, केवळ कलेवरच गुजराण असल्याचे तसेच एकरकमी कोविड दिलासा पॅकेजचा लाभ घेणार नसल्याचे व दिलेली माहिती खोटी आढळल्यास शासनाच्या अनुदान योजनेतून कायमस्वरुपी अपात्र करण्यातबाबतचे प्रतिज्ञापत्र, शाहिरी, खडीगंमत, दशावतार, झाडीपट्टी, तमाश, टुरिंग टॉकिज, सर्कस, विधीनाटय पथकासाठी पथकाने आर्थिक वर्ष 2017-2018 पासून किमान तीन वर्ष सातत्याने दरवर्षी सरासरी किमान 50 कार्यक्रमाचे सादरीकरण केले असल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडावे.
संगीतबारीसाठी आर्थिक वर्ष 2017-2018 पासून किमान तीन वर्ष सातत्याने दरवर्षी सरासरी किमान 100 कार्यक्रमाचे सादरीकरण केले असल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडावे. नाट्यसंस्थासाठी आर्थिक वर्ष 2017-2018 पासून किमान तीन वर्ष सातत्याने दरवर्षी सरासरी किमान 30 प्रयोग केल्याची नाट्यगृहे भाडेपावती, जाहिरात, तिकीट हे पुरावे जोडणे आवश्यक असेल.
एकरकमी कोविड दिलासा पॅकेज अंतर्गत एकल कलाकाराची निवडीसाठी 20 डिसेंबर, 2021 पर्यंत अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी व अर्जाच्या नमुन्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.